अखेर कास पुष्प पठार पर्यटकांसाठी खुले

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी तुरळक फुलांचा हंगाम सुरू झाल्याने बुधवारपासून पर्यटन शुल्क आकारणीस सुरुवात करण्यात आली आहे. पर्यटकांनाही कासच्या फुलोत्सवाचे वेध लागले होेते. सध्या ऑफलाईन, त्यानंतर एक सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंगला सुरुवात होणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने बुधवार पासून हंगामाची अधिकृत सुरुवात होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

पठारावर सद्यस्थितीत गेंद, कीटकभक्षी, आमरी, जांभळा तेरडा, सोनकी, टूथब्रश, वायतुरा, रानहळद, नीलिमा, मंजिरी, दीपकांडी, रोटाला, पंद, अभाळीनभाळी, भुईकारवी आदी फुलांच्या जाती तुरळक दिसत असून पठार काहीच दिवसात पूर्णपणे अच्छादित होणार आहे. बहुतांशी फुलांच्या जाती फुलण्याच्या मार्गावर आहेत.

चवर, कुमुदिनी फुलांना चांगला बहर आला असून तुरळक पांढऱ्या रंगाची छटा दिसत आहे. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी, दाट धुके, पठारावरून कोसळणारा छोटा धबधबा यामुळे पर्यटकांना कुटुंबासमवेत पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय घाटाई फाटा, कास तलावाच्या वरील बाजूस (पठाराच्या दोन्ही बाजूस) करण्यात आली आहे. सध्या तुरळक फुले दिसत असून ज्या पर्यटकांना गेटमधून आत जाऊन फुले पाहायची आहेत, त्यांना पर्यटन शुल्क द्यावे लागणार आहे.

error: Content is protected !!