सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास परिसरातील पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणार असून वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या पुष्पपठार अधिक फुलावे यासाठी उपाय योजनावर भर दिला जाईल. शासनाच्या नवीन महाबळेश्वरच्या धोरणात कास पठाराच्या विकासाला वाव दिला जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, कासचे संवर्धन तसेच स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन ही त्यांनी केले.
कास पठार प्रदूषणमुक्त होण्यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस सेवा व बायोटॉयलेटचे लोकार्पण मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीव्दारे करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करिर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पर्यटन विभागाच्या सहायक संचालिका सुप्रिया करमरकर उपस्थित होते.
या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री श्री.लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच परिसरातील गावाच्या सरपंचांचे आभार मानले. श्री. लोढा म्हणाले, पर्यटन विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर कासच्या पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. एकंदरीत
या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसीत करण्यात येईल आणि त्यातुन या भागातल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळेल तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळां ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यामातुन पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणाला ही प्राधान्य देण्यात येईल.
त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाय योजना करण्यावर भर दिला जाईल. शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण आहे, त्यामध्येही कास पठारच्या विकासाला वाव देण्यात येईल. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावरील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे.
रूचेश जयवंशी म्हणाले, कास पठारावर फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदुषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बस सेवा सुरू केली आहे.पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून आणखीन ई-बसेसचे नियोजन केले जाईल.
You must be logged in to post a comment.