केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास विलंब : ना. देसाई


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला तातडीने मदत पुरवण्याची केंद्राकडे मागणी 

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारला इतर राज्यांपेक्षा मुंबईसह महाराष्ट्राकडून कररूपाने मिळणारे उत्पन्न सर्वाधिक आहे मात्र असे असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या हक्काची मदत तातडीने पुरवली जावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.


लॉकडाऊन काळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड शहर आणि तालुक्याची संयुक्त पाहणी केली. या पाहणी दौर्‍यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  देसाई बोलत होते. मुंबईसह महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला इतर राज्यांपेक्षा कररूपातून दरवर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळते. आज देशातील कोरोनासंकट पाहाता महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला अधिकची मदत मिळणे आवश्यक आहे मात्र ही मदत पुरवण्यात केंद्र सरकारकडून विलंब होत आहे. आपल्या राज्याकडून केंद्राला मिळणारे सर्वाधिक कर उत्पन्न पाहाता राज्याचा हक्काचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पोलिस आणि प्रशासन यंत्रणेने सांगण्यापूर्वीच या लॉकडाऊनचे पालन करण्यात नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याबद्दल आणि या काळात नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले. पोलिस आणि प्रशासन चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.
पाहणीदरम्यान, शंभूराज देसाई यांनी आपल्या वाहनाचे स्वतः सारथ्य केले. बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या शेजारी बसून कराड शहर आणि तालुक्यातील कंटेन्मेंट झोनला भेट दिली तसेच कराड मेडिकल कॉलेज आणि सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णांची विचारपूस करत संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचनाही केल्या.
error: Content is protected !!