सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केरळ राज्यातील पलक्कड येथील ‘मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी’तून लुटलेले सर्वच्या सर्व साडेसात किलो सोने वितळविले असल्याचे केरळ पोलिसांनी सोमवारी उघडकीस आणले. दुपारी केरळ पोलिसांच्या एका टीमने छापा टाकल्यानंतर याचा उलगडा झाला. केरळ पोलिसांनी या रिफायनरीतून पंचवीस लाख रुपयांची ‘गोल्ड टेस्टींग मशिन’ सील करून ताब्यात घेतली.
पलक्कड येथील ‘मारूथा सोसायटी’वर दरोडा टाकून तीन कोटीहून अधिक रुपयांचे साडेसात किलो सोने लुटल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी संशयित म्हणून परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखिल जोशी याला अटक केली होती. दरम्यान, यापैकी त्याने बहुतांशी सोने सातारा जिल्ह्यातील सराफांकडे वितळविल्याचे समोर आले. याचवेळी निखिल जोशी याला पंचमुखी परिसरातील आर. जी. ज्वेलर्सचा मालक राहूल घाडगे आणि सातारा येथील एका डाॅक्टरने सहकार्य केले असल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोध सुरु केला होता. दरम्यान, हा शोध सुरु असतानाच दुसरीकडे या दोघांकडून ज्यांनी चोरीच्या सोन्याची लगड घेतली होती त्यापैकी अडीच किलो सोने केरळ पोलिसांना काही सराफांनी स्वत:हूनच आणून दिले होते. त्यानंतर केरळ पोलीस साताऱ्यातून निघून गेले होते.
मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात संशयित राहूल घाडगे स्वत:हून केरळ पोलिसांसमोर शरण आला. यनंतर केरळ पोलीस पुन्हा साताऱ्यात आले.यातील संशयित डॉक्टरची चारचाकी रविवारी दुपारी केरळ पोलिसांनी जप्त केली. संबंधित डाॅक्टरच्या दोन्ही चारचाकी आता केरळ पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, सातारा येथील भुसे गल्लीतील एका ज्वेलर्सच्या दुकानातून ‘गोल्ड टेस्टींग मशिन’ सील करुन पोलिसांनी ताब्यात घेतले. केरळ पोलिसांची टीम आणखी काही दिवस साताऱ्यात थांबणार असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.