खंबाटकी घाटात वणवा ; दोन वाहने जळून खाक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात हरेश्वर डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे वाऱ्याने ठिणगी पसरून ट्रकने पेट घेतला. खंबाटकी घाटात एका मालवाहतूक ट्रकने पेट घेतला. त्यानंतर ट्रकमधील पेटलेली पावडर रस्त्यावर पसरल्याने पाठीमागून येणारी कारनेही पेट घेतला. त्यामुळे या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली.

खंबाटकी घाटात दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास वनव्यामुळे धुराचे लोट दिसून येत होते. घाटातील जंगल भागात लागलेल्या वणव्यामुळे घाटातून बरूच ते कोल्हापूर जाणारा मालट्रक (एम एच १० सीआर ५५५०) मधील  स्टेबल ब्लिचिंग पावडरने पेट घेतला. ट्रकने अचानक पेट घेतला आणि मोठी आग लागली.  त्यापाठोपाठ मागून येणाऱ्या स्विफ्ट कार (एम एच १४ जीएफ २६८५) या कारनेही आगीमुळे पेट घेतला .  दोन्ही गाडया पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महामार्गावरील या अग्नितांडवाने खळबळ उडाल्याने  घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वणवा विझवण्याबरोबरच वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले . आगीमुळे घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने  मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. खंडाळा पोलिसांनी सर्व वाहने बोगदा मार्गे वळवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला .

error: Content is protected !!