सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कंपन्या बंद ठेवण्याची मागणी करत खंडाळा तहसिल कार्यालयावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मागणीचे निवेदन देण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असंवेदनशील असलेल्या प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले. दि. ७ ते २३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कारखाने बंद न ठेवल्यास तहसिल कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शासनाने लॉक डाऊनचे नियम व निर्बंध कडक केले असले तरी कंपनी प्रशासनाचे वागणे बेजबाबदार असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये येणारे कामगार कोरोनाची चाचणी खाजगी लॅबमध्ये करीत आहेत. अनेकजण सोयीस्कर रिपोर्ट घेत असल्याने ते इतर लोकांमध्ये वावरत असतात . त्यातीलच काही पॉझिटिव्ह झाल्यास त्याचा प्रसार वेगाने होत आहे . त्यामुळे कंपनी प्रशासनाने सरकारी तपासणी करणे गरजेचे आहे अथवा कंपनीने कामगारांची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे . पण असे घडताना दिसत नाही त्यामुळे तालुक्यातील सर्व कंपन्या बंद ठेवाव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे , प्रा. एस. वाय. पवार, प्रदिप माने, रामदास कांबळे, गणेश जाधव, सागर ढमाळ, अंकूश पवार, चंद्रकांत ढमाळ, गोविंद गाढवे, सुजित डेरे, श्रीकांत घाटे, अजय धायगुडे, प्रमोद जाधव, राजेंद्र नेवसे, शैलेश गाढवे, आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.