येळकोट…येळकोट जय मल्हार’ च्या गजरात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा- म्हाळसा विवाह संपन्न

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): येळकोट…येळकोट जय मल्हार’चा गजर, भंडारा व खोबऱ्याचे तुकडे यांची उधळण करत लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) खंडोबा-म्हाळसा यांच्या मुखवट्यांचा अनोखा शाही विवाह सोहळा पाल येथे गोरज मुहुर्तावर संपन्न झाला.

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो व वर्‍हाडी गुरुवारी पाल येथे दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व देवस्थान प्रशासन यांच्या वतीने यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.बुधवारी रात्रीपासूनच या विवाह सोहळ्याला वऱहाडी भाविक पालमध्ये दाखल होऊ लागले होते. भाविकांना देवाचे व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी देवस्थान प्रशासनाच्या वतीने दर्शनबारीची खास सोय उपलब्ध केली होती.

परंपरेनुसार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या पूर्ण सागवानी स्वःमालकीच्या रथातून देवाच्या मिरवणुकीची सुरुवात कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाडय़ापासून झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील प्रमुख मानकरी हे आपल्या मानाच्या गाडय़ासह आले होते. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाडय़ांतून खंडोबाची वऱहाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघाली. प्रत्येक वऱहाडी मंडळीच्या पुढे वाद्यवृंद वाजवत ही मंडळी ‘यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट’, असा गजर करत होते.मिरवणूक पुन्हा मंदिराकडे आली. मंदिरात आरती झाली आणि प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून ते रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविक या मिरवणुकीवर भंडारा, खोबऱयाची उधळण चोहोकडून केली जात होती.शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात पोचली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींचा मानापनाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहुर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पालनगरी सोनेरी झाल्याचे चित्र दिसून येत होते. यानंतर वऱहाडी भाविक यात्रेचा आनंद घेऊन खरेदी करून आपापल्या गावाकडे रवाना झाले.

नदीपात्रातील दक्षिण वाळवंट पूर्णपणे मोकळे ठेवण्यात आले होते, तर उत्तरेकडील वाळवंटात सर्व दुकाने, टुरिंग टॉकीज, पाळणे, हॉटेलनी भरगच्च झाले होते. विविध जिह्यांतून आलेल्या भाविकांनी दक्षिण वाळवंटात सकाळच्या जेवणासाठी चुली मांडून स्वयंपाकाची तयारी केली होती. या वाळवंटात वाघ्या-मुरळी यांचा खेळ चालू होता.

प्रशासनाकडून चोख व्यवस्था

यात्रेसाठी येणाऱया भाविकांसाठी उंब्रज, सातारा, कराड, पाटण येथून एस.टी. महामंडळाने जादा बसची सोय केली होती. तर शिरगाव, हरपळवाडी, वडगाव, मरळी मार्गावर खासगी वाहनांच्या पार्ंकगची सोय केली होती. तसेच, यात्राकाळात जादा पोलीस फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीवर नजर ठेवण्यासाठी वॉच टॉवरवरती पोलीस तैनात केले होते. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाची पथके, आरोग्य विभाग पथके, रुग्णवाहिका, सज्ज ठेवण्यात आली होती.

error: Content is protected !!