खते- बियाणांपासून कुणीही वंचित राहाणार नाही : कृषिमंत्री भुसे

खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांचे शेतकरी बांधवांना आश्वासन

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन झाले आहे. या कोरोनासंकट काळात राज्यातील एकही शेतकरी बांधव खते-बियाणांपासून वंचित राहाणार नाही, याची काळजी घेतली जाईल,’ असे आश्वासन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले.

सातारा जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री भुसे बोलत होते. यावेळी यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. महेश शिंदे, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागाचे सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते. या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध शेती प्रश्नांवर चर्चा झाली. पत्रकार आणि उपस्थित शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले,’आपण सारे जण कोरोनासंकटात सापडलो असलो तरी शेतकऱ्यांनी मात्र घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. राज्याच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे माझा एकही शेतकरी बांधव खते-बियाणांपासून वंचित राहाणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल.’

प्लास्टिक फुलांवर बंदी आणण्यावर विचार सुरू
‘फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शासनाने या प्लास्टिक फुलांच्या उत्पादनावर बंदी आणून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी एका शेतकरी बांधवाने केल्यानंतर फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्लास्टिक फुलांच्या उत्पादनावर बंदी आणण्याचा विचार सुरू असल्याचे
भुसे यांनी सांगितले.

भेसळयुक्त भंडाऱ्यात अस्सल हळदीच्या वापरावर भर देणार
जत्रा-यात्रा अथवा इतर कार्यकमांत उधळला जाणारा भंडारा भेसळयुक्त असतो. त्याच्या संपर्कात येण्याने त्वचाविकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्यात अस्सल हळदीचा वापर झाला तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि आरोग्यही जपता येऊ शकेल, अशी चर्चा आढावा बैठकीत झाल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.
error: Content is protected !!