खावलीतील क्वारंटाईन व्यक्तींना आयुर्वेदिक औषधांचे वितरण

आयुर्वेद व्यासपीठ, सातारा जनकल्याण समितीचा पुढाकार
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जगात सर्वत्र पसरलेले कोरोनासंकट अजून तरी निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा शहर आणि खावली येथे क्वारंटाईन केलेल्या सुमारे दोनशे व्यक्ती आणि आरोग्य कर्मचार्‍यांना दररोज नियमितपणे आयुष मंत्रालय निर्देशित आयुष काढा व औषधांचे वितरण करण्यात येत आहे. सातार्‍यातील आयुर्वेद व्यासपीठातर्फे व सातारा जनकल्याण समितीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. 
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. अशा व्यक्ती या प्रत्यक्ष बाधित नसूनही बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता असते. देखरेखीखाली ठेवल्या गेलेल्या अशा व्यक्तींना त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी म्हणून आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेल्या काढा आणि संशमनी वटी गोळ्या दिल्या जात आहेत. शिवाय त्यांच्या सतत संपर्कात असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांनाही या आयुर्वेदिक औषधांचे वितरण होत आहे. 
या उपक्रमात आयुर्वेद व्यासपीठाचे डॉ. समीर शिंदे, डॉ. विजय शिंगाडे, डॉ. रोहिणी पंचपोर, डॉ. संतोष महाडिक, डॉ. राहूल रेवले यांचा सहभाग असून त्यांना जनकल्याण समितीचे मुकुंद आफळे, प्रवीण देशपांडे आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे. 
हा  उपक्रम यशस्वीपणे राबवण्याकरिता त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सातारा आयुष विभागाचे डॉ. मिथुन पवार, डॉ. संजीवनी शिंदे यादव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कारखानीस यांचे विशेष सहकार्य लाभले. 
कोरोनापासून बचावासाठी संपर्क टाळण्याबरोबरच, आरोग्यदायी जीवनशैलीचा वापरही तितकाच आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्याचे नियम पाळणारी दिनचर्या, ऋतूचर्या व प्रतिकारक्षमता वाढविणार्‍या औषधांचा अंगिकार सर्वांनीच करायला हवा, असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठातर्फे करण्यात आले आहे.



Attachments area



error: Content is protected !!