सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल येथे आज किरीट सोमय्या यांनी भेट दिली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
जरंडेश्वर कारखाना स्थळावर सोमय्या यांच्या बाजूचे त्यांचे निमंत्रक व विरोधक, असे दोन गट पाहावयास मिळाले. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संस्थापक संचालक मंडळातील सदस्यांनी श्री. सोमय्या यांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव भोसले, दत्तात्रय धुमाळ, प्रकाश आबा फाळके, अविनाश फाळके, भगवान फाळके, लिला जाधव, किसनराव घाडगे यांनी जरंडेश्वर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती श्री. सोमय्या यांना केली.
या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री.सोमय्या म्हणाले, “या कारखान्याच्या संस्थापक, संचालकांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे. त्यांच्या विनंतीवरुन त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मी येथे आलो आहे. बेनामी पद्धतीने हा कारखाना घेतला आहे. त्याचा मालक कोण? याची कथा तयार केली, तर पिक्चर तयार होईल. यापूर्वी केंद्रात, राज्यात तुमची सत्ता होती. आजारी कारखान्यांना मदत करणे तुमचे काम होते. मग हा कारखाना बंद कसा पडला? आता न्यायालयाच्या आदेशाने या कारखान्याची चौकशी सुरू आहे.
जरंडेश्वरसह पाच कारखान्यांची माहिती मी घेत आहे. ‘जरंडेश्वर’ सहकारी होता, आता जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड झाला आहे. हा शेतकऱ्यांचाच कारखाना आहे, असे वाटावे, म्हणून नावामध्ये जरंडेश्वर शब्द ठेवला आहे. सामान्यांना कर्ज मिळवताना त्यांच्या सात पिढ्या जातात, तुम्हाला सात तासांमध्ये ८५ कोटींचे कर्ज कसे मिळाले? लवकरच हा घोटाळा समोर येणार आहे. मी पाच टप्प्यांत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप मूळ मालक सापडला नाही. गुरू कमोडिटीचा मालक सध्या जेलमध्ये आहे. उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्याची रेषा पवार परिवारापर्यंत पोचणार आहे.
निमंत्रकांशी बोलून झाल्यावर सोमय्या निघाले असता, विरोधक गटाने त्यांना अडवले. त्यात प्रामुख्याने जितेंद्र जगदाळे, जितेंद्र भोसले, संजय पिसाळ आदींचा समावेश होता. कारखाना सुरू राहिला पाहिजे, अशी मागणी करत या सर्वांनी भाजप वगळून उर्वरित कारखान्यांच्या मागे लागण्याचे एकतर्फी काम थांबवा, असे सुनावले.
You must be logged in to post a comment.