सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसनवीर कारखान्याने शेतकऱ्यांची ५८ कोटी रुपये थकबाकी द्यावी व गाळप विना शिल्लक राहिलेला उसाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली.
रयत संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, किसनवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज ता. वाई यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील दोन वर्षातील तब्बल ५८ कोटी रुपयांचे देणे बाकी ठेवले आहे. सन.२०२० – २१ गळीत हंगामात ५४ कोटी तर २०२१- २२ मध्ये ४ कोटी रुपये थकबाकी ठेवली आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र घाम गाळून ऊस पिकवला अन् कारखान्याला घातला. त्या कारखान्याने कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट देणे बंधनकारक होते. मात्र शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा कारखान्याने घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भविष्यात शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून आपण येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळवून द्यावेत तसेच गाळप विना शिल्लक राहिलेला उसाची नुकसान भरपाई मिळावी ही विनंती आहे. मात्र तरी देखील कोणतीच पाऊले उचलली गेली नाही तर येत्या आठ दिवसांनंतर रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.