सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भुईंज येथील किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी व कामगारांची देणी २९ ऑगस्टपूर्वी द्यावी, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ३० ऑगस्ट रोजी दिवंगत किसनवीर आबांच्या जयंती दिनी त्यांच्या कवठे येथील पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार, तर त्यावरही प्रश्न न सुटल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वाई तालुका काँग्रेस अध्यक्ष रवींद्र भिलारे, उपाध्यक्ष कल्याण पिसाळ उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचा कणा असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज या संस्थेकडून गतवर्षीच्या गळीत हंगामाची सुमारे ८० कोटी रुपयांची शेतकऱ्यांची ऊसाची बिले व्यवस्थापनाने रखडवली आहेत. कामगाराचा १८ महिन्याचा पगार दिला नाही. ऊसाची एफआरपी १४ दिवसात देणे बंधनकारक आहे. असे असताना किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज व्यवस्थापनाकडून वारंवार अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला ८० कोटी रुपये शेतकऱ्यांची देणी देणे बाकी सलून कामगारांचा १८ महिन्याचा पगार अद्यापही बाकी आहे. याबाबत व्यवस्थापन, सहकार मंत्रालय व साखर आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही.