कोमल पवार यांना महिला रत्न पुरस्कार

विश्वगंगा व महाप्रताप प्रतिष्ठानकडून सन्मानित

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘प्रायमरी पलमनरी हायपर टेन्शन’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाल्यानंतर एकाचवेळी हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जाऊन मृत्यूशी कडवी झुंज देऊन त्याच्यावर मात करणारी मृत्युंजया अर्थात कोमल पवार गोडसे यांना साताऱ्यातील विश्वगंगा व महाप्रताप प्रतिष्ठानकडून महिला रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

28 मे 2017 रोजी जवळपास तीस डॉक्टरांच्या टीमने सोळा तासांची शस्त्रक्रिया करून कोमल पवार यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते. अर्थात, याचे सारे श्रेय जाते ते कोमल पवार यांच्या जिद्दीला आणि जगण्याच्या तीव्र इच्छाशक्तीला. एकाचवेळी हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी झालेली ही महाराष्ट्रातील पहिलीच केस होती.

आपण जशी मोठ्या जिद्दीने आलेल्या संकटावर मात केली तशी दुसऱ्यांनाही जगण्याचे बळ मिळावे यासाठी कोमल पवार यांनी 28 डिसेंबर 2017 रोजी कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्या हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या रुग्णांना मार्गदर्शन करतात तसेच लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करतात. आज त्या कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.

या कार्याबद्दल त्यांना शारदा सन्मान महाराष्ट्र पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पुरस्कार, प्रेरणास्रोत व्यक्तिमत्त्व पुरस्कार, महिलारत्न पुरस्कार, आदर्श नारी पुरस्कार, झाशीची राणी पुरस्कार, जैन सामाजिक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचे हेच कार्य पाहून साताऱ्यातील विश्वगंगा व महाप्रताप प्रतिष्ठानकडून त्यांना महिला रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थापक मनोजकुमार तपासे, भोजने, लतिका येवले, महिला संघटक भारती माने, अध्यक्ष राजन धादमे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!