कोण पडळकर ? ज्यांचं दोनदा डिपॉझिट जप्त झालंय ते का..?

पडळकरांच्या ’त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यास शरद पवार यांचं शेलक्या भाषेत उत्तर 

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ’कोण पडळकर ? ज्यांचं दोनदा डिपॉझिट जप्त झालंय ते का..? अहो, लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही वेळी जे पडले त्यांच्याबद्दल काय बोलणार ? द्या सोडून,’ असं शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ’त्या’ वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

रयत शिक्षण संस्थेच्या सभेनिमित्त शरद पवार आज (शनिवारी) सातारा दौर्‍यावर आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे काढून पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत, त्यांच्यावर सडकून टीका करत निषेध नोंदवला होता. पडळकरांच्या त्या वक्तव्याला आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत शरद पवार यांनी आज त्याविषयी मौन सोडले. ’ज्यांना जनतेनं एकदा नव्हे दोनदा बाजूला केलं त्यांची आपण कशाला नोंद घ्यायची,’ असं म्हणत पडळकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, यावेळी पवार यांनी कोरोनासंकट, भारत-चीन मुद्दा, इंधन दरवाढ आदी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.

कोरोनाचं इंजेक्शन निघालंय पण ते परवडणारं नाही..!
कोरोनाचं इंजेक्शन निघालं आहे पण आपल्याला ते परवडणारं नाही. ते आपल्या देशात मिळत नाही शिवाय या इंजेक्शनसाठी 30 ते 35 हजार रुपये देणं आपल्या माणसाला परवडणारं नाही. त्यामुळं आत्मविश्वासानं उभं राहाणं, काळजी घेणं हाच पर्याय आहे. आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
error: Content is protected !!