सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढतच आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे पाच फुटांवरुन दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ओढे, नाले भरुन वाहिल्याने कोयना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. अवघ्या २४ तासांत साडे सोळा टीएमसी पाणी वाढण्याचाही विक्रम नोंद झाला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. तर त्यापूर्वीच धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर पाऊस वाढल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे १० फुटापर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने साडे पाच फुटांपर्यंत दरवाजे खाली घेण्यात आले. गेले पाच दिवस दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर होते. पण, पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणातही आवक होत आहे. तसेच साठा ९० टीएमसीवर असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे ९ फुटापर्यंत उघडण्यात आले. त्यामधून ४७२४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृह २१०० असा मिळून ४९३४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूर आल्याने नदीकाठच्या रहिवशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इतर धरणांतीलही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
दरम्यान, गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४३ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३००७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला २० आणि जूनपासून आतापर्यंत ३८२० मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४६ आणि आतापर्यंत ३८८१ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.चौकट :जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्गधोम धरणातून ४०१२ क्यूसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ४०९४, बलकवडी ३८६, उरमोडी २९१९ आणि तारळी धरणातून १५३२ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७५.५८ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८५.२४, बलकवडी ८६.६६, उरमोडी धरण ७४.३५ आणि तारळी धरणात ८५.७० टक्के पाणीसाठा झाला होता.
You must be logged in to post a comment.