कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटांवर


प्रतिसेकंद 55 हजार क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा,(भूमीशिल्प वृत्तसेवा): कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पडणार्‍या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात प्रतिसेकंद 67 हजार 696 क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी झाला असून पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी 8.30 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट, सकाळी 11 वाजता 6  फूट, त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा 7 फूट आणि चार वाजता 10 फुटाने उचलून कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद 55 हजार 246 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल साडे सहा टीएमसी इतकी विक्रमी पाण्याची आवक झाली असल्याने रविवारी सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 90 टीएमसी झाला होता. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग शुक्रवारपासून सुरु करण्यात आला होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्याने आणि भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उदभवू नये यासाठी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीची निर्धारित लेव्हल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना जलसिंचन विभागाने घेतला आणि त्यानुसार शनिवार दि. 14  रोजी दुपारी 2 वाजून 1 मिनिटांनी धरणाचे सहा वक्र दरवाजे 1.9 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 11 हजार 427 क्यूसेक वेगाने कोयना पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी सकाळी 8.30 वाजता पुन्हा सहा वक्र दरवाजे 4 फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 25 हजार 604  क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
दरम्यान, सकाळी 8 वाजल्यापासून धरणाच्या पायथा वीज गृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच पुन्हा धरणाच्या सहा वक्र दरवाजे 6 फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 33 हजार 732 क्यूसेक्स आणि पारथा वीज गृहातून 2 हजार 100 क्यूसेक्स असे मिळून एकूण कोयना नदीपात्रात तब्बल 35 हजार 622 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे रविवारी दुपारी 2 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी एक फूट उचलून 7 फूटावर उचलण्यात आले. मात्र त्यानंतर हवामान खात्राने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे सायंकाळी 4 वाजता धरणाचे दरवाजे उचलून प्रतिसेकंद 52 हजार 146 क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून 2 हजार 100 क्यूसेक्स असे एकूण 54 हजार 246 क्यूसेक्स वेगाने कोरना नदीपात्रात विसर्ग सुरू कण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोरना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला महापुराचे स्वरूप आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर रेथे 282 मिलीमीटर, नवजा रेथे 324 मिलीमीटर तर महाबळेश्‍वर रेथे 203 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत  धरणात प्रतिसेकंद 59 हजार 258 क्यूसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी 2152.6 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी इतका झाला आहे. तसेच चेरापुंजीनंतर सर्वात जास्त पावसाची नोंद होत असलेल्या पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ परिसरात असणार्‍या पाथरपुंज येथे पावसाने 4 हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. येथे 27 (4639) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात येणार्‍या पश्‍चिम घाटातील पर्जन्यक्षेत्रातही पर्जन्यवृष्टी सुरूच असून प्रतापगड रेथे 40 (3364), सोनाट 20 (2766), बामणोली 39 (2381), वळवण 35 (4411) काठी 61 (2381) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!