क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी ऊर्जादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देशाला लाभलेले वरदान आहेत. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय त्यांनी घेतली. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन अफाट अशा सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते . माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहे, अशा शब्दात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. या ठिकाणी वर्षभर लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येईल. सावित्रीबाई फुले यांचे कर्तॄत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंती सोहळा महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने नायगाव( ता . खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर , आमदार महादेव जानकर , अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेत, असे सांगून श्री.शिंदे म्हणाले, स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे तर सबला आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे . या ठिकाणी त्यांचे स्मारक सुस्थितीत आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्र पुरोगामी घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारतीय नौसेनेतील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. लढाऊ विमाने महिला चालवत आहेत. त्यांचा अभिमान आपल्याला असून या सर्वांचे मूळ प्रेरणा स्त्रोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले डोंगराएवढे काम हे आहे. सावित्रीबाई नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहायचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचे हे शिकवण त्यांनी दिली. फुले दांपत्याचे कार्य इतके मोठे होते की त्यांना मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांचे देखील त्यांच्या कार्याने मतपरिवर्तन झाले.

फुले दांपत्य हा आपला अभिमान

फुले दांपत्य हा आपला अभिमान आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या हजारो पिढ्यांना राहावे यासाठी त्यांचे भिडे वाड्यात मोठे स्मारक उभे करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासनाने अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये लेक लाडकी, जिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्ति करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग, विक्री यासाठीही आपण योजना करत आहोत. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी ७२ शासकीय वसतीगृह जानेवारी अखेरपर्यंत सुरू होत आहेत.

यावेळी छगन भुजबळ यांनी समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा यांच्यावर प्रहार करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, असे सांगून नायगाव येथील त्यांच्या स्मारकासाठी हरी नरके यांनी दिलेल्या योगदानाची आठवण केली. शाळेय मुलींच्या उपस्थिती भत्त्याचा ठराव ३२ वर्षांपूर्वी केला होता त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता व्यक्त केली. मुलींचे शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडाला अशी मानसिकता असणाऱ्या समाजात स्त्री शिक्षणासाठी सुरुवात करताना सावित्रीबाईंनी असंख्य हाल अपेष्टा सहन केल्या म्हणूनच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत.

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्याच्या माध्यमातून केल्याने हे शक्य झाले. प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे सांगून छगन भुजबळ यांनी समाजसेवेसाठी स्वतःचा आत्मा, स्वतःचे बलिदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून राज्याप्रमाणे संपूर्ण देशात साजरा व्हावा यासाठी माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले. मुलींना एनडीए मधील प्रशिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रबोधिनीला २४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.या प्रबोधिनीसाठी लवकरात लवकर जागाही उपलब्ध करून द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

मंत्री अतुल सावे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे , असे सांगून महिलांना स्वयं सिद्ध करण्यासाठी विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन यावेळी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाज्योतीच्या माध्यमातून एनडीए व पोलीस प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे , जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. नायगावला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी नायगाव या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी शासनाने मूलभूत सोयी सुविधांचे जाळे निर्माण केले आहे, असे सांगून या ठिकाणी पर्यटक , विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यावेत. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईं फुले यांची प्रेरणा घेऊन समाजात मूलभूत परिवर्तनासाठी कार्य करावे. यासाठी जागतिक दर्जाचे स्टडी सेंटर या ठिकाणी निश्चितपणे उभे करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी नायगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अधिकाधिक प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्त्रियांचा संघर्ष हा जन्मापासून नव्हे तर गर्भापासूनच सुरू आहे. विधवा प्रथा आणि बाल विवाह प्रतिबंधाचे ठराव ग्रामपंचायत स्तरावर मंजूर होत आहेत, त्यांचे अंमलबजावणीही काटेकोरपणे झाली पाहिजे अशी आग्रह भूमिका मांडली.

यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी नायगाव नगरीत शासनाने दहा एकर जमीन खरेदी करावी व त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी केली.

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. महाज्योती मार्फत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री महोदयांच्याहस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन केले.

सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख,महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सरपंच साधना नेवसे, यांच्या सह अधिकारी, पदाधिकारी, बचत गटातील महिला, शालेय महाविदयालयीन युवती, व नागरिक यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!