सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा हा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. या जिल्ह्याने आतापर्यंत अनेक सुपुत्र या देशाच्या सेवेसाठी दिले आहेत. आता या जिल्ह्यातल्या महिलाही यामध्ये काही मागे नाहीत. गांजे गावातल्या ग्रामस्थांनी त्या गावातल्या पहिल्या महिला फौजीचे स्वागत अगदी जंगी आणि फुलांच्या वर्षावात केलं आहे.
शिल्पा चिकणे असं या महिला सैनिकाचं नाव असून ती गांजे गावातील लष्करात भरती होणारी पहिलीच महिला आहे. ती गावात परतल्यानंतर गावकऱ्यांनी तिचे अगदी जंगी पद्धतीने आणि फुलांच्या वर्षावात स्वागत केलं.
शिल्पा चिकणे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील बिकट परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती झाली. त्या गावातील प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान तिने प्राप्त केला. त्यामुळे गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचा ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
फुलांची उधळण, भारत माता की जय चा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाच्या कडक एन्ट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले. सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफल मधे निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आज आली. त्या निमित्ताने आपल्या गावातील कन्येच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गांजे गावातील चिकणे या दाम्पत्याची ही चौथी कन्या. घरची परिस्थिती बेताचीच. आई वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत त्या तोडीचे काम केले. गांजे गावातून मेढ्याला पायी जात जावळी करिअर अकॅडमीमधे प्रचंड कष्ट करत शिल्पाने आसाम रायफलमधे भरती होण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमाने आज तीने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे.
लेकीचा तो वर्दीतील रुबाब पाहून, ग्रामस्थांनी केलेल जंगी स्वागत पाहून मनाच समाधान झाले. आज मुलगा नसल्याचं शल्य न वाटता लेकीचा अभिमान वाटत आहे. हे सर्व पाहून मन भरून आले अशा शब्दात शिल्पाच्या वडिलांनी, पांडुरंग चिकणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
You must be logged in to post a comment.