लाचखोर कामगारआयुक्‍त पोलिसांच्या जाळ्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिरवळ येथील कंपनीतील कामगारांची नोंदणी करण्यासाठी दोन लाखांची लाच घेत असताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सहायक कामगार आयुक्‍त संजय शामराव महानवर (वय 42, हल्ली रा. धुमाळ निवासस्थान, सत्त्वशीलनगर, संभाजीनगर, सातारा, मूळ रा. माढा) याला अटक केली. अटकेतील महानवरने या कामासाठी एकूण 11 लाखांची मागणी केली होती. 

शिरवळ (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीत एक कंपनी असून, त्याठिकाणी एका खासगी कंपनीकडून कामगार पुरविण्यात येतात. या कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज लेबर सप्लायर कंपनीने सातारा येथील सहायक कामगार आयुक्‍तालयाकडे केला होता. अर्ज दाखल झाल्यानंतर सहायक कामगार आयुक्‍त संजय महानवर यांच्याशी लेबर सप्लायर कंपनीच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. या वेळी महानगर याने त्याच्याकडे कामगार नोंदणी करण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देणे शक्‍य नसल्याने लेबर सप्लायर करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने तडजोडीची विनंती महानवर यांच्याकडे केली. 

यानुसार तडजोडीअंती महानवर यांनी आठ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याची तक्रार नंतर लेबर सप्लायर कंपनीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. यानुसार तक्रारीची शहानिशा करून लाच घेताना महानवरला पकडण्यासाठीचा सापळा आज रचला. सापळ्यादरम्यान दोन लाखांची लाच घेताना महानवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या कारवाईत उपअधीक्षक अशोक शिर्के, निरीक्षक अविनाश जगताप, कर्मचारी शिंदे, ताटे, खरात, काटकर, भोसले कर्मचारी सहभागी झाले होते. 

error: Content is protected !!