बनावट मेसेज तयार करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या पराग शेणोलकरला अटक करण्याची पत्रकारांची मागणी
सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील पत्रकारांची बदनामी करुन अफवा पसरवत असल्याप्रकरणी कराड येथील पराग शेणोलकर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी सातारा शहरातील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून श्री .शेख यांनी साताऱ्यातील पत्रकारांबाबत खोट्या अफवा पसरविणाऱ्याच्या विरोधात ठोस कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
याबाबत पत्रकारांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना प्रत्यक्ष भेटून या निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की, साताऱ्यातील पत्रकारीतेला दर्जा आहे. अनेक पत्रकारांनी साताऱ्याचे नाव महाराष्ट्रभर केले आहे. साताऱ्यातील पत्रकारितेला शुभ्र धवल इतिहासही आहे अन्याय अत्याचारावर मात करणाऱ्या घटना घडामोडींचे वार्तांकन आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी साताऱ्याच्या पत्रकारांनी समाजकारणात बहुमोल योगदान दिले आहे. मात्र कराड येथील रहिवासी असलेला पराग शेणोलकर हा विकृत मनोवृत्तीचा व कधीकाळी पत्रकारितेत काम केलेला हा व्यक्ती गेले काही वर्षे सातत्याने तो स्वतः ॲडमिन असलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार’ या व्हॉट्सअप ग्रुपवरुन सातारा जिल्ह्यातील विशेषतः सातारा शहरात कार्यरत असलेल्या वरीष्ठ पत्रकारांची सातत्याने बदनामी करत आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने साताऱ्यातील ज्येष्ठ व वरीष्ठ पत्रकारांना लोकप्रतिनिधींकडून मारहाण झाल्याचा खोटा बनावट मेसेज तयार करुन अनेक ग्रुपवर व्हायरल केला. याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडेही खात्री केली. त्यांनीही सर्व यंत्रणांद्वारे चौकशी करुन असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. असे असताना संबंधित व्यक्ती वारंवार साताऱ्यातील पत्रकारांची बदनामी व्हावी, या दृष्ट व विकृत हेतूने अफवा पसरवत आहे.संबंधिताविरोधात यापूर्वीच तक्रार अर्ज दिला आहे. असे असतानाही संबंधित इसम खोटा व बनावट तक्रार अर्ज देवून पोलीस दलावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनाच्या धमक्या देवून कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून अशांतता माजेल असे वर्तन करत आहे. तरी संबंधितावर अफवा पसरवल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी साताऱ्यातील सर्वच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक्स व डिजिटल माध्यमातून प्रमुख पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही अफवा पसरवणाऱ्या पराग शेणोलकर यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
You must be logged in to post a comment.