सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नदीकाठावरील शिवारात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. खोडशी, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फासकीतून निसटण्याच्या प्रयत्नात बिबट्याच्या पंजाला जखम झाली असून वन विभागाने त्याला ताब्यात घेत औषधोपचार सुरू केले आहेत. दरम्यान, हा सापळा लावणाऱ्या गुऱ्हाळघरावर काम करणाऱ्या बाबूराव सखाराम जाधव याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
खोडशी येथे कृष्णा नदीकाठी सावकार वस्ती नावाचे शिवार असून या शिवारात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. या शिवारात सोमवारी रात्री अज्ञात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीवर पाय पडल्यामुळे बिबट्याचा पंजा त्यामध्ये अडकला. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी त्याने धडपड केली. त्यामध्ये त्याचा पंजाही पूर्णपणे तुटला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी काही शेतकरी शेतामध्ये निघालेले असताना त्यांना फासकीत अडकलेला बिबट्या दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. तसेच पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वायजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक रमेश जाधवर त्या ठिकाणी पोहोचले.
You must be logged in to post a comment.