सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :बिबट्याच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. कराड परिसरात तर अनेकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल रात्री तर चक्क गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी येथील निवासस्थान परिसरात एक बिबट्या आढळून आला.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्याने हल्ला करून एका बालकाला ठार केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याला पाहिल्याचे बोलले जात होते. आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी याची चर्चा मोबाईल, व्हॉट्सऍपद्वारे इतर ठिकाणच्या बिबट्याचे फोटो व व्हिडिओ सर्वदूर पसरत होत आहेत.
सध्या ऊसतोड हंगाम वेग घेत असताना बिबट्याचा वावर व येणाऱ्या अफवांमुळे काही ठिकाणी ऊसतोडीला ब्रेक बसू लागला आहे. गावागावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सर्वजण दहशतीखाली वावरू लागले आहेत.
दरम्यान काल रात्री गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई मरळी तालुका पाटण येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची चर्चा करीत होते. त्यावेळी निवासस्थानाच्या परिसरात अचानक बिबट्या आल्याने सगळ्यांचीच पळता भुई थोडी झाली. यावेळी लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान ही घटना निवासस्थानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
You must be logged in to post a comment.