सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा असून आपला जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा सैनिक स्कूलच्या सभागृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे उद्घाटन श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सैनिक स्कूलचे लेंप्टनन कर्नल पी.डी. पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.
सध्या वाहतुकीचा वेग वाढला असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, या वाढलेल्या वेगामुळेच अपघतांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रवास करताना सर्वांनी वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. उशिर होतो म्हणून वेगाने वाहन चालविण्या ऐवजी वेळेच्या आदी पाच मिनिटे निघने महत्वाचे आहे. सहसा रात्रीचा प्रवास टाळावा. अपघात टाळण्यासाठी डोळे महत्वाचे आहेत. डोळे दिपणे, डोळे लागणे अशा कारणांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे प्रवास करताना जास्ती काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग्य नियोजन करा त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मोबाईलचा वापर टाळणे म्हणजेच अपघात टाळने. अपघात मुक्ती ही सर्वांची सामुदायीक जाबाबदारी आहे. तसेच एखादा अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना मदत करणेही तितकेच महत्वाचे आहे. सर्वांच्या सामुदायीक प्रयत्नांनेच अपघातांची संख्या कमी करता येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, रस्ता सुरक्षामध्ये नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देशच लोकांमध्ये जागृता निर्माण करणे हा आहे. नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीचे नियम पाळावेत. विद्यार्थ्यांनाही या अभियानामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची भावना निर्माण झाल्यावर त्यातून जबाबदार नागरिक निर्माण होतात. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकामध्ये श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील ३४ ब्लॅकस्पॉट कमी केल्याचे सांगून रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश व महत्व याची माहिती दिली. हेल्मेटचा वापर व पादचाऱ्यांनी फुटपाथ नसलेल्या ठिकाणी उजव्या बाजुने चालावे या विषयी जागृती करणे हे ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या अपघात नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून हेल्मेटचा वापर, वेग, ऊस वाहतूक करणारी वाहणे यांची तपासणी केली जाते. वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी सुमारे १० हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच दरमहा ६० लाख रुपयांचा दंड विभागाकडून वसुल केला जातो. खासगी बसेसवर राज्यात सर्वाधिक कारवाई सातारा विभागाकडून करण्यात आली आहे. दुचाकी स्वारांची सुरक्षा यास प्राधान्य देवून अंमलबजावणी केली जात आहे. अपघातप्रवण स्थळांची यादी तयार करण्यात आली असून त्या तालुक्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा नियमित आढावा घेतला जातो. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघात तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शास्त्रीय तपाणी करुन पुन्हा त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातात.
यावेळी आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.