तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया 

उदयनराजे भोसले यांचे आवाहन, वाई तालुक्यातील पसरणीत काळभैरवनाथाचे घेतले दर्शन 

वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): तरुण मुले देशाचे भविष्य आहेत. त्यांना प्रगती पथावर नेण्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार निवडून देऊया असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

पसरणी ता. वाई येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले माजी उपसभापती विजयसिंह नायकवडी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड ,पसरणीच्या सरपंच हेमलता गायकवाड ,रोहिदास पिसाळ ,दीपक धनवडे,विकास शिंदे,भाजप तालुका उपाध्यक्ष यादव महांगडे, चंद्रकांत धायगुडे, राजश्रीताई धायगुडे, राजेंद्र गायकवाड,सुनील महांगडे, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश येवते यांची उपस्थिती होती. 

उदयनराजे म्हणाले, भैरवनाथाला नतमस्तक होऊन मी विजयाचं लेणं मागितला आहे. ज्या ठिकाणी स्थिर सरकार असते तिथेच विकास होत असतो. भाजप,शिवसेना आरपीआय, रासप यांचे महायुतीचे सरकार देशात स्थिर सरकार देऊ शकते. पूर्वी काँग्रेसच्या सत्ता काळात केवळ दोन लोकसभा सदस्य होते. त्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश होता. भाजपने दोन वरून स्थिर सत्तेपर्यंत मजल मारलेली आहे. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. मोदी सरकारने राबवलेले अनेक उपक्रम जनतेसाठी फायदेशीर ठरले. विरोधकांकडे मात्र पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही.

मदन भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे वंशज सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वाई तालुक्यांमध्ये पसरणीतून होतोय त्यामुळे श्री काळभैरवनाथांचा उदयनराजेंना आशीर्वाद मिळाला आहे. 

अशोकराव गायकवाड म्हणाले, उदयनराजेंना पसरणीतून सगळ्यात जास्त लीड देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना दारिद्र्याला सामोरे जावे लागले होते.आज शेतकरी, महिला, मजूर, खेळाडू यांना चांगले दिवस आलेले आहेत. शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरला आहे.जो राजा महाराष्ट्राच्या मनामनावर अधिराज्य गाजवतो त्याच राजाच्या वंशजाला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी जीवाचे रान करायचे आहे.

काँग्रेसचे मिली जुली सरकार मध्ये ब्लॅकमेलिंग

दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे मिली जुली सरकार केंद्र सत्तेवर होते.अशा सरकारमध्ये ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढत असतो. त्यामुळे स्थिर सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे असे उदयनराजे म्हणाले.

error: Content is protected !!