शिवजयंतीसाठी निर्बंधात शिथिलता द्यावी; गृहराज्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (ता. १९) होत आहे. हा जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी लेखी पत्राव्दारे विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, दोन वर्षांपासून राज्यात कोविड महामारीच्या अनुषंगाने विविध धार्मिक, राजकीय व विविध धर्मांच्या उत्सवांवर निर्बंध लागू केले होते. त्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात आली. त्यासाठी जनतेचे चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यात राज्य शासनासह सर्वजण यशस्वी झालो आहोत. सध्या संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाने काही निर्बंध हे आज देखील लागू केले आहेत.

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी मोठया उत्साहात साजरी करण्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र, कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधामुळे शिवप्रेमी व पोलिस विभागांत शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत तसेच शिवज्योत परवानगी देण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
याबाबत काही निर्बंध व अटी शिथील केल्यास शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी होईल. यंदाची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

error: Content is protected !!