सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा : ग्रंथालय केवळ पुस्तकांचा संग्रह असलेली जागा नाही तर ही एक संकल्पना आहे. “ग्रंथालय या संकल्पनेअंतर्गत ज्ञानाचा प्रसार होणं, ज्ञानाची लालसा जागृत ठेवणं, ज्ञान देणं-घेणं, संवर्धन करणं या गोष्टी अंतर्भूत आहेत. ही अशी जागा आहे जिथे सर्वांना येण्याची परवानगी आहे. शाळा महाविद्यालय केवळ शैक्षणिक ज्ञानदान करतात. परंतु शाळा-महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जीवन समृध्द करण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालय करीत असतात. त्यामुळे ही ग्रंथालये म्हणजे खऱ्या अर्थाने लोकविद्यापीठ आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केले.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सोनवणे यांनी भाष्य केले. ग्रंथालय निरीक्षक किरण पाटील, तांत्रिक सहाय्यक संजय ढेरे, ग्रंथपाल संतोष लाड, स्वप्नील शिंदे, विशाल भोसले व प्रवीण देसाई उपस्थित होते. यावेळी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध पुस्तके मांडण्यात आली होती. या स्टॉलवर कादंबरी, आत्मचरित्र, कथा यांच्यासह स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रदर्शनास साहित्यिक, साहित्यप्रेमी यांच्यासह विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
किरण पाटील म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचा उदय हा ग्रंथालयांसाठी मारक नाही तर तारकच ठरला आहे. कॉम्प्युटर्स आल्यापासून पुस्तकांची माहिती ठेवण्यात अधिक सुसूत्रता निर्माण झाली आहे. विविध सॉफ्टवेअर्सचा वापर करून क्षणार्धात समजू शकतं की कोणतं पुस्तक कुणाकडे आहे. कुणाची गरज काय आहे हे ओळखून ग्रंथालय सेवा देऊ शकतात. संदर्भ ठेवणे, डॉक्युमेंटेशन ही कामं सुलभ झाली आहेत, त्यामुळे ग्रंथपालाचा तसंच वाचकाचा वेळ वाचू लागला आहे.
संजय ढेरे म्हणाले, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ग्रंथालयाचं महत्त्व कमी झालेलं नाही आणि कधी होणार देखील नाही. कारण इंटरनेटवर त्या विषयाच्या संदर्भातील सखोल माहिती उपलब्ध होत नाही. त्यासाठी पुन्हा जर्नल्स किंवा पुस्तकांचा विषय आलाच. इंटरनेटवर पुस्तकं सर्व उपलब्ध नाहीत. त्यांचे शीर्षक (टायटल्स) किंवा अनुक्रमणिका (कंटेट लिस्ट) उपलब्ध असते, पण पूर्ण पुस्तक उपलब्ध नसतं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.
You must be logged in to post a comment.