८० फूट खोल दरीत पडलेल्या युवकाला जीवदान

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्यातील पांडवगड येथे विनायक राजपुरे रा. वाई हा युवक आपल्या सहकारी मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता. गड चढताना पाय घसरुन तो खोल दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून तो ८० फूट खोल दरीतील झाडांच्या वेलीत अडकला.

 घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की  किल्ले पांडवगडावर वाई येथील कु.विनायक राजपुरे व त्याचे मित्र रविवारी सकाळी  भटकंतीसाठी गेले होते. ते पांडेवाडी मार्गे गड चढले. परंतु, गड उतरताना विनायकचे मित्र पांडेवाडी मार्गे पुढे गेले आणि विनायक चुकीच्या वाटेने गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या कड्याकडे गेला. तिथून तो सकाळी ११:३० च्या सुमारास ८० फूट कड्यावरून खाली दरीत पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याने मित्रांना फोन करून याबाबतची माहिती दिली आणि मोबाईलवरून त्याचे लोकेशन सेंड केले. नंतर त्याच्या मित्रांनी याबाबतीत माहिती जवळच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी ही माहिती आणि लोकेशन वाईतील गिर्यारोहण संस्थाना दिली. संस्थेतील सदस्यांनी त्वरित गुंडेवाडी मार्गे पांडवगडाकडे धाव घेतली. गुगल मॅपच्या लोकेशन वरून मुलाची शोधा-शोध चालू होता. उन्हाचा तडाखा, घनदाट जंगल, घसाऱ्याची वाट या अडचणी पार करत अखेर एक सदस्य दुपारी ४:३० वाजता विनायक जवळ पोहोचला. त्याला पाणी पाजून धीर दिला. नंतर हळूहळू बाकीचे सर्व सदस्य लोकेशन वर पोहोचले. मुलाचा उजवा हात फ्रँक्चर झालेला असून हातपायाला मुका मार लागलेला होता. नंतर त्याला स्ट्रेचर वरून गडाखाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

error: Content is protected !!