सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :कराड तालुक्यातील बनवडी येथील शिवारात ऊसाच्या फडातील पाचोळ्याला अचानक लागलेल्या आगीत ११ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात ऊस तोडीसाठी आली आहे. या मजुरांच्या टोळीकडून परिसरातील ऊसाची तोडणी सुरू असून गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाची तोडणी करण्यासाठी मजूर शेतात गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांच्या सोबत अकरा महिन्यांची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊसतोडणी सुरू असताना नंदिनीला झोपवले आणि तिला झोळीमध्ये बांधून ठेऊन ऊस तोडण्यासाठी फडात गेल्या. यावेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर ऊस तोडणीमध्ये व्यस्त असताना नंदिनीला ज्या ठिकाणी झोळीत ठेवले होते, त्या ठिकाणी पाचोळ्याला आग लागल्याचे निदर्शनास आले. तेव्हा मजुरांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाचोळा विझविला. मात्र, पाचोळ्याला लागलेल्या या आगीत अकरा महिन्यांची नंदिनी भाजून गंभीर जखमी झाली.
मजुरांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.