लॉकडाऊन 5.0 : कोरोनानं दिला सर्वाधिक त्रास !


अवघ्या एका महिन्यात जिल्ह्यात 529 जणांना बाधा; 24 जणांनी गमावला जीव

सातारा (भूमिशिल्प स्पेशल) : दि. 1 ते 30 जून या तीस दिवसांचा लॉकडाऊन काळ जिल्ह्यासाठी प्रचंड त्रासदायक ठरला. लॉकडाऊन शिथिलतेमुळे परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात परतलेले लोक आणि अनेकांकडून संस्थात्मक तसेच होम क्वारंटाईनच्या झालेल्या नियमभंगाचा मोठा फटका आपल्या जिल्ह्याला बसला. पूर्वीच्या चार लॉकडाऊनच्या 68 दिवसांच्या कालावधीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या या एकट्या पाचव्या लॉकडाउनने अवघ्या 30 दिवसांत गाठली. चारही लॉकडाऊन मिळून जिल्ह्यात 516 पॉझिटिव्ह सापडले होते आणि आता एकट्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये 529 पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे याच काळात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांनी एक हजारांचा टप्पा ओलांडला. चारही लॉकडाऊन मिळून जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू झाला होता पण आता एकट्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये 24 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे चारही लॉकडाऊन मिळून जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या संख्येच्या प्रमाणात या पाचव्या लॉकडाऊनमध्ये 3 ते 4 पटींनी वाढ झाली असून या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 580 जण पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज (मंगळवारी) आणखी 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आजपर्यंत पाळल्या गेलेल्या पाचही लॉकडाऊन काळातील एकूण कोरोनाबाधित, मृत्यू पावलेले एकूण रुग्ण आणि एकूण कोरोनामुक्त यांच्या आकडेवारीवर भूमिशिल्प’ने टाकलेला हा दृष्टिक्षेप…

लॉकडाऊन 5.0 (1 जून – 30 जून)
जिल्ह्यात 1 जूनपासून सुरू झालेल्या पाचव्या लॉकडाऊनचा काळ 30 दिवसांचा म्हणजे 1 जून ते 30 जूनपर्यंत होता. 1 जून रोजी जिल्ह्यात (40) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर 2 तारखेला (02), 3 तारखेला (13), 4 ला (08), 5 ला (20), 6 ला (21), 7 ला (01), 8 ला (28), 10 ला (40), 11 ला (14), 12 ला (15), 13 ला (08), 14 ला (12), 15 ला (07),
16 ला (21), 17 ला (07), 18 ला (18), 19 ला (13), 20 ला (04), 21 ला (14), 22 ला (27), 23 ला (02), 24 ला (19), 25 ला (22), 26 ला (03), 27 ला (28), 28 ला (36), 29 ला (58), 30 ला (14) असे एकूण (529) पॉझिटिव्ह रुग्ण या पाचव्या लॉकडाऊनमध्ये आढळून आले. या लॉकडाऊनकाळात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊन 4.0 ( 18 मे- 31 मे)
जिल्ह्यात 18 मेपासून सुरू झालेल्या चौथ्या लॉकडाऊनचा काळ 14 दिवसांचा म्हणजे 18 मे ते 31मेपर्यंत होता.18 मे रोजी जिल्ह्यात (8) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर 19 तारखेला (20), 20 तारखेला (15), 22 तारखेला (20), 23 तारखेला (77), 24 तारखेला (31), 25 तारखेला (27), 26 तारखेला (58), 27 तारखेला (28), 28 तारखेला (31), 29 तारखेला (30) आणि 30 तारखेला (33) असे एकूण (378) पॉझिटिव्ह रुग्ण या चौथ्या लॉकडाऊनमध्ये आढळून आले. चौथ्या लॉकडाऊनमध्ये एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. त्यात (5) महिला आणि (14) पुरुषांचा समावेश आहे.

लॉकडाऊन 3.0 (4 मे- 17 मे)
जिल्ह्यात 4 मेपासून सुरू झालेल्या तिसऱ्या लॉकडाऊनचा काळ 14 दिवसांचा म्हणजे 4 मे ते 17 मेपर्यंत होता. 6 मे रोजी (12) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर 7 तारखेला (21), 8 तारखेला (1), 9 तारखेला (3), 11 व 12 तारखेला प्रत्येकी (1), 13 तारखेला (2), 15 तारखेला (9), आणि 17 तारखेला (5) असे एकूण (55) पॉझिटिव्ह रुग्ण या तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये आढळून आले. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही.

लॉकडाऊन 2.0 (15 एप्रिल- 3 मे)
जिल्ह्यात 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लॉकडाऊनचा काळ 19 दिवसांचा म्हणजे 22 एप्रिल ते 3 मेपर्यंत होता.15 एप्रिल रोजी (4) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर याच महिन्यातील 19 व 21 तारखेला प्रत्येकी (3), 22 तारखेला (1), 23 तारखेला (3), 24 तारखेला (12), 25 तारखेला (2), 27 तारखेला (6), 29 तारखेला (2) आणि 30 एप्रिलला (1) रुग्ण आढळून आला. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या तारखेला (10), 2 तारखेला (21) आणि 3 तारखेला (8) असे एकूण (76) पॉझिटिव्ह रुग्ण या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आढळून आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही.

लॉकडाऊन 1.0 (25 मार्च-14 एप्रिल)
जिल्ह्यात 25 मार्चपासून सुरू झालेल्या पहिल्या लॉकडाऊनचा काळ 21दिवसांचा म्हणजे 22 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत होता. 23 मार्च रोजी जिल्ह्यात सर्वांत पहिल्यांदा (2) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर एप्रिल महिन्यातील 2 व 5 तारखेला प्रत्येकी (1), 6 तारखेला (2) आणि 10 तारखेला (1) असे एकूण (7) पॉझिटिव्ह रुग्ण या पहिल्या लॉकडाऊनमध्ये आढळून आले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 6 एप्रिल रोजी (1) आणि आणि 11 एप्रिल रोजी (1) अशा एकूण दोन कोरोनाबाधित पुरुषांचा मृत्यू झाला.

पाचव्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक मृत्यूंची नोंद
लॉकडाऊन मृत्यू 5.0(मृत्यू 24) , 4.0 (मृत्यू19 ) ,3.0 (मृत्यू00) , 2.0 (मृत्यू00) ,1.0 (मृत्यू02)
(चारही लॉकडाऊनमध्ये मिळून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या पाहाता एकट्या पाचव्या लॉकडाऊन काळात मृत्यू पावलेल्यांची संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे.)

‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या एक हजारांच्या पार !
दि. 6 जून रोजी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांनी 600 चा तर 11 रोजी 700 चा आकडा ओलांडला. त्यानंतर 19 रोजी 800 चा तर 27 रोजी 900 चा आकडा ओलांडला मात्र त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत हा आकडा एक हजारांच्या पार गेला.


कोरोनाची जिल्ह्यातील सद्यस्थिती…
आज पाचव्या लॉकडाऊन अखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1045 झाली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. 740 जण पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी पोचले असून 259 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल (सोमवारी) राज्य सरकारने पुन्हा आणखी एक म्हणजे सहावा लॉकडाऊन जाहीर केला. याचा कालावधी 1 जुलै – 31 जुलै असा 31 दिवसांचा असणार असून आता या कालावधीत कोरोनावर मात करण्यासाठी सरकार आणखी काय उपाययोजना आखतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!