जिल्ह्यात 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढती टक्केवारी लक्षात घेऊन 10 तारखे पर्यंत असलेली लॉकडाऊनची मुदत 15 तारखे पर्यंत वाढविल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुण वर्ग जास्त बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. यावेळी किराणा, दूध, भाजीपाला इत्यादी बंद ची 10 मे ची मर्यादा वाढवून 15 मे पर्यंत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेंत.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.


जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट मंजूर केले आहेत तेथे तात्काळ प्लँट सुरु करण्याच्या कामास प्राधान्य द्यावे, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लँट सुरु करावेत,याबाबत साखर कारखान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कामाबरोबर कोरोनाबाबतची इतर कामे करीत आहेत. त्यांचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत केले.

error: Content is protected !!