सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा, कराड, फलटण शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर १० टक्क्यांच्यावर गेला असल्याने सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकाने, कोल्ड स्टोरेज, गोदामे, रुग्णालय, निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधे दुकाने, औषधी कंपन्या, वैद्यकीय उपकरणे विक्रीची दुकाने, सेबीच्या नियंत्रणातील सर्व कार्यालये, भारतीय रिझर्व बँकेने नियुक्त केलेल्या सर्व सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधी उत्पादने, सर्व प्रकारच्या वित्तसंस्था, वृत्तपत्रे यांना परवानगी राहणार आहे. राज्य शासनाच्या २५ जून रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे जी रुग्णवाढ नोंदवली जाते, त्यानुसार संबंधित जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यानुसार सातारा जिल्ह्याचा रुग्ण वाढीचा दर १२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.
You must be logged in to post a comment.