लॉकडाऊन शिथिलतेमुळे कैलास स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारांच्या प्रमाणात वाढ


…मात्र वास्तव समजून घेणे महत्त्वाचे 

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचे प्रमाण वाढले आहे. मे 2020 मध्ये साधारण 15 टक्के तर जून मध्ये (महिना पूर्ण होण्यापूर्वीच) हे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनासंकटापूर्वी सरासरी 120 ते 130 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते मात्र लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण 90 ते 100 पर्यंत पोहचले आहे. अशा परिस्थितीतही कैलास स्मशानभूमी आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असली तरी सातारकरांनी मात्र येथील वास्तव परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.


श्री बालाजी ट्रस्टने 2003 मध्ये लोकसहभागातून उभारलेल्या कैलास स्मशानभूमीबाबत बोलताना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सांगितले, की सन 2003 पूर्वी सातारकरांसाठी स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराचा विधी संगम माहुली येथे नदीकिनारी उघड्यावर व घाणीच्या साम्राज्यात होत असे. सातारा शहर, त्रिशंकू परिसर आणि शाहूपुरी, खेड, गोडोली, कोडोली, विलासपूर, संभाजीनगर, खिंडवाडी, देगाव, कारंडवाडी, धनगरवाडी, सैदापूर, दरे खुर्द, जकातवाडी कोंडवे अशा 14 ग्रामपंचायत हद्दीतील मृत व्यक्तींवर (स्वतःच्या गावाची स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने) कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. स्मशानभूमीची उभारणी करते वेळी व त्यानंतर तिची देखभाल करतेवेळी श्री बालाजी ट्रस्टला गेली 20 वर्षांच्या काळात नैसर्गिक, आर्थिक अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र श्री बालाजी ट्रस्ट कधीच खचले नाही किंवा मागे हटून स्मशानभूमीचे काम थांबवले नाही. वरील बाबींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले व आजही होत आहेत तरीही श्री बालाजी ट्रस्ट लोकांच्या विश्वास आणि प्रेमामुळे त्या प्रश्नांना तोंड देण्यास सक्षम आहे.
‘सातारकरांनी वास्तव समजून घ्यावे’
गेली दोन महिन्यांपासून कोरोनामुळे अंत्यसंस्कारा दरम्यान वेगळ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गैरसमज होऊ नये याकरिता सातारकरांसमोर हे वास्तव मांडणे आवश्यक वाटते, असे चोरगे म्हणाले. यातली काही कारणे सांगताना ते म्हणाले, की कोविड 19 या आजारामुळे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील व्यक्ती सातारा येथे उपचार घेताना मृत्यू पावली तर तिच्यावर अंत्यसंस्कार कैलास स्मशानभूमीतच करणे शासनाने बंधनकारक केले आहे. बदलते वातावरण आणि पावसाळा यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी सातार्‍यात वेगवेगळ्या कारणामुळे परजिल्हा, परराज्यातून उपचारासाठी किंवा पाहुण्यांकडे आलेल्या व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांच्यावरील अंत्यसंस्कार त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात किंवा गावी नेऊन केले जात होते परंतु कोरोनाच्या भीतीमुळे आता त्यांचे मूळ गाववाले मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी देत नाहीत किंवा परजिल्ह्यात कोरोनाच्या भीतीमुळे पाहुणे पण येत नाहीत. इतकेच नव्हे तर मृतदेह नेण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील अंत्यसंस्कारही कैलास स्मशानभूमीतच करावे लागत आहेत. आपले मूळ सातारचे लोक कामानिमित्त परजिल्ह्यात अनेक वर्षे राहात आहेत किंवा कोविड 19 आजार सोडून कोणत्याही आजाराने किंवा वृद्धापकाळाने अशा व्यक्तींचा मृत्यू परजिल्ह्यात झाला तर मृत व्यक्तीची इच्छा म्हणून याच स्मशानभूमीत त्यास व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढतोय 
वरील सर्व कारणांमुळे कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांचे प्रमाण वाढत कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढत आहे. कधी कधी अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्या कारणाने दुर्दैवाने मृतदेह परत पाठवायला सांगावे लागत आहे. सावडणे विधी तिसर्‍या दिवशी असतो मात्र दुसर्‍या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळावी म्हणून तो दुसर्‍या दिवशीच करणे भाग पडत आहे. या सर्व बाबींमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून श्री बालाजी ट्रस्टने प्रशासनास कळवून अंत्यसंस्कार कार्यासाठी काही नियम व अटी घातल्या आहेत जेणे करून अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडून लोकांचा गैरसमज होऊ नये अथवा त्यांना त्रास होऊ नये.


‘नियम, अटी पाळूया; वाद टाळू या’
परजिल्हा किंवा तालुक्यातील रहिवाशाचा सातार्‍यात मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास स्थानिक प्रशासन म्हणजेच नगरपालिका, ग्रामपंचायत, तहसील यापैकी एका ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करून तसे पत्र अंत्यसंस्कारासाठी म्हणून श्री बालाजी ट्रस्टच्या नावे घेणे आवश्यक आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कैलास स्मशानभूमीत कागदपत्रांची पूर्तता करून तशी नोंद करणे आवश्यक आहे.(मृत व्यक्तीचा आणि माहिती देणार्‍या व्यक्तीचा फोटो, रहिवास प्रूफ आधार, रेशनिंग कार्ड किंवा इतर शासकीय कार्ड) तसेच अपघात, आत्महत्या, या कारणाने मृत्यू झाला असल्यास पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून शवविच्छेदन करणे आवश्यक आहे.


‘गैरसमज करून घेऊ नका, समजून घ्या’
प्रिंट मीडिया, सोशल मीडिया तसेच शववाहिनी चालक  व ट्रस्ट कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सातारकरांना वेळोवेळी ‘कैलास नियमावली’ कळवत आलो आहोतच परंतु अजूनही काही लोक माहिती न घेता गैरसमज करून स्मशानभूमीत वाद घालत असतात हे दुर्दैव आहे. लोकांची सेवा करणे आमचे कर्तव्यच आहे परंतु परिस्थिती नुसार येणार्‍या अडचणी सुद्धा सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत, असे आवाहनही चोरगे यांनी केले. एकतर स्मशानभूमीत काम करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. काही लोक कर्मचार्‍यांबरोबर वाद घालत असल्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडत असून त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. हे असेच सुरू राहिले तर ते कामावर येणे सुद्धा बंद करतील.  त्यामुळे याचा त्रास सर्वांनाच होऊ शकतो. आपली स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर आणि अशीच परिपूर्ण राहावी म्हणून आपण सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक नाही का, असा सवालही त्यांनी केला.
error: Content is protected !!