लॉकडाऊनमध्ये 7 हजार क्विंटल फळे, भाजीपाला विक्री

जिल्हा कृषी विभागाच्या पुढाकारामुळं शेतकरी, ग्राहक समाधानी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे पिकविणार्‍या शेतकर्‍यांच्या नाशिवंत मालाचे नुकसान होऊन त्यांना तोटा सहन करावा लागू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने तब्बल सात हजार क्विंटल फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी समन्वय घडवून आणल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले. 

कृषी विभाग ठरला शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा !
कोरोनासंकट आणि लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या तब्बल 7 हजार 135 क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेत शेतकरी व प्रत्यक्ष ग्राहक यांच्यात समन्वयाची भूमिका बजावली. लॉकडाऊन काळात गाव आणि शहरातील आठवडी बाजार बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतातच पडून राहण्याची भीती होती. शेतकर्‍यांची नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा म्हणून काम करत कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली. कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्यात 10 ते 15 शेतकर्‍यांचा मिळून 500 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक गटांची स्थापना केली. या उत्पादक गटांच्या मालाची विक्री आणि थेट विक्री करणार्‍या शेतकर्‍यांसाठी साधारण 160 विक्री केंद्र कार्यान्वित करुन दिले. 

अवघ्या तीन महिन्यांत विक्रमी विक्री
या शेतमालात 4 हजार 543 क्विंटल भाजीपाला आणि 2 हजार 591 क्विंटल विविध फळांचा समावेश आहे. ही सर्व विक्री ऑनलाईन आणि थेट स्वरुपात झाली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आजअखेर केवळ तीन महिन्यांत ही एवढी विक्री झाली. 

असा साधला समन्वय…
शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी उपलब्ध बाजारपेठेची माहिती देणे, विविध शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शेतमालाची थेट विक्री करु इच्छिणार्‍या ग्रामीण भागातील शेतकर्‍याला शहरातील ग्राहक मिळवून देणे,  शेतकरी आणि प्रत्यक्ष ग्राहक यांच्यात शेतमाल विक्रीसाठी समन्वय ठेवणे, जमिनीचे तुकडीकरण टाळून गटशेतीसाठी प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीने समन्वय साधण्यात आला. 

शेतकर्‍यांना झालेला फायदा
शेतमाल पडून न राहता वेळीच बाजारपेठ मिळाली.लॉकडाऊनमध्ये आर्थिक नुकसान टळले भविष्यातील विक्रीसाठी बाजारपेठेबद्दल माहिती मिळाली. 

ग्राहकांना झालेला फायदा
बाजारासाठी बाहेर पडावे लागले नाही, स्वतःच्या घराच्या दारावरती ताजा भाजीपाला मिळाला, थेट शेतकर्‍यांमार्फत स्वस्त दरात खरेदी केल्यामुळे ग्राहकांचा फायदा झाला.


विविध शेतकरी गट तसेच शेतकर्‍यांना शहरातील सोसायट्यांशी समन्वय साधून लॉकडाऊन काळात फळे व भाजीपाला पुरवठा नियमित करण्याचे कामकाज कृषी विभागाने केले. शेतकर्‍यांच्या फळे व भाजीपाल्याला चांगला दर मिळाला तसेच शेतकरी व ग्राहक अशा दोहोंना फायदा झाला. लॉकडाऊनमध्ये कृषी विभागाने शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य केले. 
– विजयकुमार राऊत 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा


कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी ’एमसीडीसी’अंतर्गत आमच्या शेतकरी स्वयंसहायता समूहाची नोंदणी करण्यास मदत केली तसेच पुणे येथील विविध सोसायटी ग्राहक म्हणून मिळवून दिले. यानंतर या समूहामार्फत आम्ही 42 ते 43 शेतकर्‍यांचा भाजीपाला एकत्रित करून तो पुणे येथे नेऊन विकत होतो. यामधून आम्हा सर्व शेतकर्‍यांना लॉकडाऊन काळातही चांगला नफा मिळाला. 
– विजयसिंह भोसले
अध्यक्ष, जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूह, पेरले (ता. कराड)

error: Content is protected !!