‘लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करायचंय !’

‘एमपीएससी’त पहिला आलेल्या प्रसाद चौगुले याचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवा अंतिम परीक्षेत मी राज्यात पहिला आलो असलो तरी लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून मला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे,’ असा निर्धार प्रसाद बसवेश्वर चौगुले याने ‘भूमिशिल्प’शी बोलताना व्यक्त केला.


प्रसादच्या यशानं जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा !
जुलै 2019 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य सेवा अंतिम परीक्षेत सर्वसाधारण गटात बनवडी (ता. कराड) येथील प्रसाद चौगुले राज्यात पहिला आल्यानंतर राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रसाद चौगुले याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद तर आहेच शिवाय त्याच्या यशानं जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

… असा घडला प्रसादचा शैक्षणिक प्रवास !
प्रसादचं प्राथमिक शिक्षण कराड तालुक्यातील उंब्रज येथे झालं. सातारा येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं कराड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

 ‘फियाट’ मधील नोकरी सोडून केली परीक्षेची तयारी
मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेत असताना 2017 मध्ये कॅम्पसमधून पुण्यातील फियाट कंपनीत निवड झाली. 2017 – 2018 दरम्यान नोकरीही केली. मात्र समाजासाठी, उपेक्षित घटकांसाठी काही तरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी करता करता मनात कुठं तरी स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार घोळत होताच. त्यासाठी पुण्यात एक महिनाभर मार्गदर्शनही घेतले. अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेत पूर्णवेळ परीक्षेचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. कंपनी सोडण्यापूर्वीच अभ्यासाचं सूक्ष्म नियोजन केलं होतं. चिकाटीनं अभ्यास केला आणि परीक्षेला सामोरं गेलो. लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणं आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणं हे माझं ध्येय असून ते गाठण्यासाठी यंदा ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची तयारीही मी सुरू केली आहे हे सांगण्यासही तो विसरला नाही. 
‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा…
किनारा तुला पामराला..!’

‘भूमिशिल्प’तर्फे प्रसाद चौगुले याचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सहृदय शुभेच्छा !

प्रसादनं सांगितला यशोशिखर गाठण्याचा कानमंत्र!
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेचा अभ्यास समजून घेणं. आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यानंतर विषयनिहाय वेळ ठरवणं आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणार्‍या (स्कोअरिंग सब्जेक्टस) विषयांचा अभ्यास करण्यावर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाणित साहित्याचा वापर करणं. उदा. मिनिस्टर वेबसाइटवर प्रसिद्ध होणारं प्रमाणित साहित्य (स्टँडर्ड मटेरिअल), इंडिया एअर बुक यांचा वापर करावा शिवाय नुसतीच पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे कसे बारकाईनं अभ्यासता येतील हे पाहावे. शेवटचं आणि अति महत्त्वाचं म्हणजे नीटनेटके नियोजन आणि रोजचा सराव..!


एक वर्षाचा खडतर प्रवास आणि हाती यशाचा ‘प्रसाद’
जुलै 2018 ते जुलै 2019 या एक वर्षात प्रसादनं केलेला खडतर प्रवास त्याच्या ओंजळीत यशाचा प्रसाद ठेवून गेला. अर्थात, त्यानं पूर्वीपासूनच या परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यानं दिलेल्या पूर्व परीक्षेत 400 पैकी 240 गुण मिळवले. त्यानंतरच्या मुख्य परीक्षेत 800 पैकी 528 गुण तर प्रत्यक्ष मुलाखतीत 100 पैकी 60 गुण मिळवत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला.


‘प्रसाद, तुला आणखी पुढं जायचंय..!’
‘एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या प्रसादनं आणखी पुढं जावं आणि भविष्यात या ही पुढील परीक्षा देऊन देशाची व जनतेची सेवा करावी,’ अशी इच्छा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्यावतीनं प्रसादचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कुटुंबाची साथ आणि नातेवाईकांचा हात!
‘वडील बसवेश्वर चौगुले यांनी आयटीआय केलेला तर आई सौ. उमा ही सातवी शिकलेली. वडील शहापूर एमआयडीसीतील वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतात तर आई गृहिणी म्हणून घर सांभाळते. मला दोन विवाहित बहिणी. या अशा आमच्या संपूर्ण परिवारात स्पर्धा परीक्षा देणारा मी पहिलाच होतो. मी नोकरी सोडून परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यानंतर माझे आई – वडील, बहिणी आणि भाऊजींनी मला पाठिंबा तर दिलाच शिवाय आमचा तुझ्यावर विश्वास आहे, असं म्हणत मला प्रोत्साहितही केलं. एकूणच कुटुंबाची साथ आणि नातेवाईकांचा हात लाभल्यामुळंच मी आज इथवर पोचू शकलो.’
error: Content is protected !!