महाबळेश्वरकरांना घरपट्टीमध्ये सुमारे 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील पर्यावरण पूरक इमारती व नियम पाळणाऱ्या मिळकतधारकांना नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या निर्णयामुळे घरपट्टीमध्ये सुमारे 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार. नुकत्याच प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या निर्णयाची एप्रिल 2022 पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती दिली.

महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांना येथिल बांधकामातील पर्यावरण पूरक नियम पाळल्यास सुमारे 5 टक्क्यांपर्यंत घरपट्टीमध्ये सूट मिळण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नुकतीच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत केला आहे. त्यामुळे मिळकतधारकांना या नविन निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या निर्णयामुळे पालिका हद्दीतील मिळकतधारकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने देखील निश्चित स्वरुपात पालिकेला भविष्यात मदत होणार आहे.

शहरातील पर्यावरण वाचावे व त्याबाबत जनजागृती व्हावी व नागरिकांना देखिल त्याचे महत्व पटण्याकरीता वेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केले. यासाठी टॅक्सी व्यावसायिकांना ईलेक्ट्रिक वाहने वापरण्याकरीता आवाहण, वेण्णा लेक येथे सोलरवरती चालणाऱ्या बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याबाबत असेल तसेच अनेक वर्ष रखडलेली पाण्याची नळ जोडणीचे निर्णयांसारखे निर्णयांमुळे त्यांनी पर्यावरण, प्रशासन व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करुन शहरातील अनेक अडचणी सोडविण्यावर भर दिला.
सर्वसाधारण सभेमध्ये घरपट्टीवाढ व नियमित घरपट्टीच्या वसूलीसाठी त्यांनी घरपट्टीमध्ये पर्यावरण पूरक घरांना सूट देण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर हे पावसाचे आगार आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतू पडणाऱ्या पावसाचे पाणी हे डोंगर उताराने सर्व पाणी वाहून जाते. सध्या वाढत असलेली लोकसंख्येला व येणाऱ्या लाखो पर्यटकांना वापरासाठी पाणी कमी पडू नये यासाठी केवळ पाणी साठवणूक करुन चालणार नाही तर जमिनीत पाणी मुरविणे देखिल गरजेचे असल्याचे महत्व नागरिकांना कळावे यासाठी मुख्याधिकारी यांनी घरपट्टीमध्ये रेन वॅाटर हार्वेस्टिंगसाठी 1 टक्के सूट जाहीर केली आहे. तसेच आपल्या ईमारतीवर सौर उर्जेचा वापर करुन पारंपारीक उर्जेचा वापर करणाऱ्यांना देखिल 1 टक्के सूट, याबरोबर घरगुती किंवा व्यावसायिक वापरामध्ये ईलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणाऱ्यांदेखिल 2 टक्का सूट अशी एकूण चार टक्के सूट जाहीर केली आहे. याचबरोबर शासनाच्या निर्णयानुसार घरपट्टीची मागणी पालिकेने केल्यानंतर ती पंधरा दिवसांच्या आत भरल्यास आणखी 1 टक्का सूट मिळत असल्याने घरपट्टीमध्ये भरघोस अशी 5 टक्के सूट मिळकतधारकांना मिळणार आहे. याबाबत मात्र संपुर्ण वर्षभर सदरची साधने वापरल्याचे पुरावे नगरपालिकेस सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर पुढील बिलामध्ये ही सूट मिळणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. पालिकेच्या आर्थिक व मुख्य स्तोत्र असलेल्या घरपट्टीबाबत अश्या प्रकारे सकारात्मक निर्णय घेतल्याने मुख्याधिकारी पाटील यांच्या कामाबाबत सामान्य नागरिकातून कौतूक होत आहे.

error: Content is protected !!