सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर, व जावली तालुक्यातील पाचगणीमधील लोकांचा मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. मागील एक वर्षांपासून लाॅकडाऊन सदृश्य परिस्थिती असल्यामुळे दोन्ही तालुक्यात लोकांना रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने लाॅकडाऊन आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत महाबळेश्वर तालुक्याचा कोरोना रूग्णवाढीचा दर सर्वात कमी आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळावरील लाॅकडाउनचे निर्बंध हटविण्यात यावे,’ या मागणीसाठी व्यावसायिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लाॅकडाऊन मागे घेण्याची मागणी केली.
यावेळी आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, नगरसेवक संदीप साळुंखे, विशाल तोष्णीवाल, अॅड संजय जंगम, अतुल सलागरे, सचिन वागदरे, असिफ मुलाणी, अभिजीत खुरासणे, रवींद्र कुंभारदरे, जीवन महाबळेश्वरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये ही मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर उपस्थित होते.लाॅकडाउनमुळे महाबळेश्वर येथील बाजारपेठेवर जे निर्बंध आहेत. त्यामुळे सर्व सामान्य व्यापारी तसेच शहरातील टॅक्सी, घोडा व्यवसायिक, हातगाडी, टपरीधारक, पथारीवाले व ज्यांचे हातावर पोट आहे, ते सर्व त्रस्त झाले आहे. अनेकांची उपासमार सुरू झाली आहे. अनेकांच्या मागे बँकांच्या वसुलीचा तगादा लागला आहे. बाजारपेठ तातडीने सुरू व्हावी या मागणीसाठी सोमवारी येथील व्यापारी प्रतिनिधी यांच्या शिष्ट मंडळाने आ मकरंद पाटील यांची सातारा येथील निवासस्थानी भेट घेतली याभेटी नंतर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी प्रतिनिधी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर सिह यांची भेट घेवून चर्चा केली. महाबळेश्वर येथील सर्व घटकांच्या व्यथा आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या. बाजारपेठ तातडीने सुरू करा अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘सातारा जिल्हा हा घटक आहे. त्यामुळे जे नियम लागू होतील ते सातारा जिल्हयासाठी असतील. एखादया तालुक्यासाठी स्वतंत्र नियमावली काढता येत नाही. तरीही खास बाब म्हणून महाबळेश्वर व पाचगणी येथील छोटया व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी दोन ते तीन दिवसात विचार करून निर्णय घेतला जाईल.’महाबळेश्वर व पाचगाणी येथे शनिवार, रविवारी मोठया प्रमाणावर गर्दी होते. म्हणून येथील स्थानिक लोकांनी नियमांचे पालन केले पाहीजे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जे नियम केले आहे. त्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. रेस्टाॅरंटमध्ये कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. यापुढे अशा प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर होईलच परंतु ते रेस्टाॅरंट सील देखील केले जाईल.’
कोरोनाचे प्रमाणपत्र अथवा कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना महाबळेश्वर येथे प्रवेश देण्यात येईल असे प्रमाणपत्र अथवा लस घेतलेली नाही अशा पर्यटकांना नाक्यावरूनच परत पाठविण्यात येईल अशा प्रकारे काही नियम करून महाबळेश्वर व पाचगणी येथील बाजारपेठेवरील निर्बंध हटविण्याबाबत आपण विचार करू असेही या वेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.