धरणातील अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला दिल्यास पूराचे संकट टळेल – महादेव जानकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – राज्यात मागील काही वर्षांपासून वारंवार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पूराच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे संकट सोडवण्यासाठी कृष्णा, कोयनेचे अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, अशी मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.

अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यामुळे पाटण तालुक्याचे मोठे नुकसान झाले. येथील नुकसानीची आमदार महादेव जानकर यांनी पाहणी केली. तसेच मोरगिरी, ता. पाटण येथील शाळेत वास्तव्यास स्थलांतरीत करण्यात आलेल्या पुरग्रस्तांची त्यांनी भेट दिली. पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

यावेळी जानकर म्हणाले, कोयना, कृष्णेचे पाणी सातारा, सांगली जिल्ह्यातील माण, खटाव, खानापूर, कवठेमहाकाळ, जत, आटपाडी, पंढरपूर या दुष्काळी तालुक्याला दिले. तर हा परिसर सुजलाम सुपलाम होईल. येथील फळबाग वाढतील. तसेच येथील लोकांचे पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेलच. त्याचबरोबर पूरासारखे संकट निर्माण होणार नाही.

या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे पाणी वळण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे जानकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!