खासदार उदयनराजेंच्या प्रचारार्थ विलासपुरमध्ये शुक्रवारी महापदयात्रा

प्रचंड मताधिक्याने उदयनराजेंना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार :फिरोज पठाण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवार, दि.३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता विलासपूर,गोळीबार मैदान परिसरात सातारा शहरातील सर्वात मोठी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनी दिली.

याबाबत बोलताना फिरोज पठाण म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ भाजप व मित्र पक्षाकडून उमेदवार असलेले श्रीमंत छ्त्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी आपण व्यक्तिगत स्वरूपात प्रचार पत्रके काढली असून अन्य कार्यकर्त्यांपेक्षा अधिक मोठी अभूतपूर्व अशी पदयात्रा साताऱ्यातून काढणार आहोत. भाजपाच्या कमळाला मत म्हणजे उदयनराजेंना मत आणि त्याद्वारे देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे यासाठी आपण आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार ही पदयात्रा काढत आहोत.ही पदयात्रा फिरोज पठाण यांच्या विलासपूर येथील जनसंपर्क कार्यालयापासून सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून विलासपूर,गोळीबार मैदान परिसरातील प्रत्येक घरात जाऊन महाराजांचे प्रचार पत्रक आणि भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या दहा वर्षात भाजपाच्या सरकारने जनतेच्या विकासाचा विचार करून विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे त्या अविरत चालू ठेवण्यासाठी आणि आणखी प्रगती साध्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून देणे गरजेचे आहे, ही भूमिका सर्वांना समजावी म्हणूनच घरोघरी फिरून आपण महाराजांचा प्रचार करत आहोत. त्या दृष्टीने साताऱ्यात या निवडणुकीत कोणीही काढली नाही एवढी मोठी पदयात्रा काढण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यामध्ये स्वतः खा.उदयनराजे भोसले, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका,भाजप व मित्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या पदयात्रेत विलासपूर,गोळीबार मैदान परिसरातील सर्व आबालवृद्ध ,नागरिक, युवक -युवती यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व ही महापदयात्रा यशस्वी करावी तसेच प्रचंड मताधिक्याने महाराजसाहेबांना विजयी करावे, असे आवाहनही फिरोज पठाण यांनी केले आहे.

error: Content is protected !!