मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही मजबूत करूया : पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण; जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) भारताची लोकशाही जगात मोठी व बळकट आहे.मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपण सर्वांनी लोकशाही मजबूत करूया असे आवाहन पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्री देसाई बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकरी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशीनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, श्रीमती विजयादेवी शिवाजीराव देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करतील, असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आयोगाने नमूद कागदपत्रापैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील. त्यामध्ये आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक लायसन (ड्रायव्हींग लायसन), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक(RGI)यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र सरकार/ राज्य शासन/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,संसद सदस्य/ विधानसभा सदस्य/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (युडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, आतापर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्राने समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.देशातीलच नव्हे तर जगातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा हा लौकिक निर्माण करण्यात, देश-विदेशात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मराठी सुपुत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या सर्व सुपुत्रांचे, त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून कौतुक करतो. महाराष्ट्र राज्य जसे विविधतेने नटलेले आहे, आपला जिल्हाही तसाच सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. क्रांतिकारकांचा, सैनिकांचा, गड किल्ल्यांचा, पर्यटनस्थळास अमाप संधी असणारा जिल्हा म्हणून सर्वश्रुत आहे. कृषी,सहकार, क्रीडा, साहित्य, यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या या सातारा जिल्ह्याची गौरवी,ऐतिहासिक,क्रांतिकारक परंपरा अखंडपणे पुढे नेवूया असे आवाहन करतो.

आज आपला महाराष्ट्र ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. राज्याने आज अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. उद्योग, व्यवसाय, सेवा यासह आयटी, ऊर्जा निर्मिती अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. राज्याचा हा प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहण्यासाठी आपण सर्व नेहमीच प्रयत्नशील राहुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वतंत्र सैनिक, वीर माता, आजी-माजी सैनिक व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस, गृहरक्षक दल यांनी मानवंदना दिली.

व्हिडिओ पहा..

error: Content is protected !!