महाराष्ट्र केसरीसाठी शासनाने दमडीही दिली नाही : साहेबराव पवार

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली ती दानशुर मंडळीच्या सहकार्यामुळे आणि सातारा तालिम संघाच्या नियोजनामुळे. शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. पण शासनाने एक रुपयांची मदत केली नाही. आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरीला शासनाकडून किती निधी दिला ते माहिती घ्या. बक्षीस संयोजकांच्यावतीने दिले जात नाही. म.के. विजेत्या पृथ्वीराज पाटीलने खंत व्यक्त केली, त्याला बक्षिस मिळाले पाहिजे. आम्ही आमच्या खिशातले 9 लाख रुपये सर्व विजेत्या मल्लांना देत आहोत, असे सातारा तालिम संघाचे मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी सांगितले.

 सातारा तालिम संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साहेबराव पवार म्हणाले, विजेत्या मल्लांना पैसे द्यायचा माझा मानस होता. त्यानुसार उसाचे पैसे काल आले आणि आज लगेच सर्व विजेत्या मल्लांना पैसे देण्याचा निर्णय घेतला. पैसे वैयक्तिक देत आहोत. कोणी इश्यू केला म्हणून हे पैसे देत नाही. पृथ्वीराज पाटीलने जी खंत व्यक्त केली, त्याला बक्षिस मिळाले पाहिजे. हे माझ्याही मनाला लागले. म्हणून मी पैसे देत आहे. एवढी मोठी स्पर्धा साताऱ्यात झाली. त्या स्पर्धेला शासनाने एक रुपयाही मदत केली नाही. आमच्या हिमतीवर सारे नियोजन सातारा तालिम संघाने केले. संघटना मोठी असते त्या वेळेला कार्यकर्ता मोठा होतो. 60 वर्ष मी ही तालिम जिवंत ठेवली आहे.

आता ती अजरामर करायचे काम तुमचे आहे. सगळय़ांनी हातात हात घालून काम केले की, सातारा तालिम पुढे जाईल. इमारतीचे काम अर्धवट राहिले आहे. 2 कोटी 75 लाख रुपये आले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांकडे असून या कामाला गती मिळेल. दरम्यान, दीपक पवार यांनी महाराष्ट्र केसरीच्या नियोजनासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एकही पैसा दिला नसल्याची खंत व्यक्त केली. आमच्या तालमीत कोणताही गटतट नाही, आम्ही एक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!