मतदान केंद्राच्या परीसरात उमेदवारांची फोटोग्राफी; केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी

महारुद्र तिकुंडे यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मतदान केंद्रापासून किमान १०० मीटर अंतराच्या परीसरात फोटो,व्हिडीओ काढण्यास प्रतिबंध असताना आज जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेले अनेक उमेदवारांचे मतदान कक्षात मतदान करतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मतदान केंद्रांवरील हे प्रकार नियमबाह्य असून याप्रकरणी मतदान केंद्र प्रमुखांवर कारवाई करावी अशा मागणीची तक्रार निवडणुक आयोगाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येते.

आज बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. यावेळी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरात छायाचित्रीकरण करण्यास बंदी असतानाही सातारा जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी विविध मतदान केंद्रांवरील मतदान कक्षात तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परीसराच्या आत फोटो, व्हिडिओ काढलेले सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा प्रकार निवडणुक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन करणारा असून मतदांनकेंद्रावरील गैरप्रकारांची जबाबदारी ही येथील केंद्र प्रमुखांची आहे. त्यामुळे असे प्रकार घडलेल्या मतदान केंद्र प्रमुखांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे टोल फ्री क्रमांक १९५० येथे तक्रारीच्या माध्यमातून माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!