महाविकास आघाडीने निवडणुकीला एकदिलाने सामोरे जावे

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष व समविचारी घटक पक्षांनी सामूहिकपणे व एकदिलाने विधानसभा निवडणुकीस सामोरे जावे. असे झाल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षासोबत समन्वय ठेवावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादी भवन येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक झाली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, रजनी पवार, आनंदी अवघडे, अस्लम तडसलकर, समीर देसाई, ऍड. शरद जांभळे यांच्यासह इतर घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष व समविचारी घटक पक्षांनी सामूहिकपणे व एकदिलाने विधानसभा निवडणुकीत सामोरे जायचे आहे. आपण एकदिलाने सामोरे गेल्यास महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षासोबत समन्वय ठेवावा. लोकसभा निवडणुकीत काही घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही तसे न करता सर्वाना विश्वासात घेऊन काम करूयात. भाजप हे सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करू लागले असून कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे पदाधिकारी त्याला बळी न पडत महायुती सरकार घालवण्यासाठी काम करायचे आहे. सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. शिंदे म्हणाले, महायुतीतील सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे. कोणतेही कारण दाखवून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, कार्यकर्ता हा प्रामाणिक असल्याने त्यांनी त्यांना भीक घालू नये. भाजप सारख्या जातीयवादी पक्षास घालवण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. सध्या वातावरण चांगले असून महाविकास आघाडीला विजयाकडे नेईल यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.

आ.पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. तशीच बैठक पुन्हा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर घेणे गरजेचे आहे. बैठक घेतल्यानंतर आघाडीस पोषक असे वातावरण निर्माण होते व कार्यकर्ता जोशाने काम करतो.महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यातील वरिष्ठ नेत्यांना बोलावून आगामी काळात मेळावा घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!