महेश शिंदे भ्रमिष्ठासारखे काहीही बरळतात : जयंत पाटील

शशिकांत शिंदे दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा): यशवंतराव चव्हाण यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य शरद पवार यांनीच केले आहे. ते यशवंतरावांचे मानसपुत्र असून यशवंत विचारांवर अधिकारवाणीने केवळ तेच बोलू शकतात, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत काय बोलायचे हेच सुचत नसल्याने काही लोक भ्रमिष्ठासारखे काहीही बरळतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ केळघर (ता. जावली) येथे कोपरा सभेसाठी आल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे निवडून येणार, हे १०० टक्के मी सांगतो. सकाळपासून मी शशिकांत शिंदे यांच्यासोबत या परीसरात प्रचार करीत आहे.मतदारसंघातील सर्वच गावांतून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्तेही मोठ्या उत्साहात आणि जोमाने प्रचार करत आहेत. आजच्या सभेला डोंगरी भागातील सर्वसामान्य जनता ही उत्स्फूर्तपणे आली, हेच निवडणुकीचा निकाल काय असेल हे सांगून जाते. किमान दोन लाखांच्या फरकाने शशिकांत शिंदे लोकसभेत निवडून जातील, अशी आम्हास खात्री वाटत आहे.

समोर उदयनराजेंचं आव्हान आहे याकडे याबद्दल विचारले असता, उदयनराजेंना तिकीटच एवढ्या उशिरा भाजपने दिलं.त्यांना द्यावं की नाय द्यावं या द्विधा मनस्थितीत भाजपा होती. त्यातच उदयनराजेंचा पराभव झालाय असे मला वाटते असे पाटील म्हणाले.

शशिकांत शिंदेवर होणाऱ्या आरोपांबाबत बोलताना पाटील म्हणाले,निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निकालाचा अंदाज आल्याने शशिकांत शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. हे चूकीचे आहे. मात्र खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास हा सर्व प्रकार लक्षात घेऊन जनता चिडून राष्ट्रवादीलाच विजयी करेल तसेच लोकं चिडल्यामुळे दोन लाखाने निवडून देण्याऐवजी तिन लाखाने शशिकांत शिंदे यांचा विजय होईल अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवारांची लायकी नाही अशी भाषा वापरली त्याबद्दल बोलतांना पाटील म्हणाले, कि काही लोकं भ्रमिष्ट झालेली असतात त्यांना काही दिसत नाही, काय बोलायचं हेही सुचत नाही. त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार महाराष्ट्रात शरद पवारांनी वाढवले, टिकवले. त्यांचं कार्य पुढं नेले. आणि आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचाच विचार म्हणून लोकं शरद पवार यांच्याकडे पाहतात. त्यामुळं यशवंत विचारांवर अधिकारवाणीने केवळ तेच बोलू शकतात, आमदार शिंदेंचा तो अधिकार नाही. अशा शब्दांत महेश शिंदे यांच्यावर पाटील यांनी टीका केली.

दरम्यान तुतारी वाजवणारा माणूस व तुतारी या चिन्हांंबाबतच्या संभ्रमाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, ही दोन्ही चिन्हे भिन्न आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे आहेत. मतदान यंत्रावर निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दर्शविले जाते.चिन्हाच्या नावापेक्षाही चिन्हाच्या आकारावरून मतदार करत असतो. अपक्ष उमेदवाराला मिळालेले चिन्ह म्हणजे ट्रंपेट आहे, त्याला तुतारी म्हणणे चुकीचे आहे. मात्र तुतारी वाजवणारा माणूस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावरच आम्ही सातारा मतदारसंघातही विजय संपादन करू, याची आम्हास खात्री वाटते, असेही जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

error: Content is protected !!