महेश शिंदेंनी त्यांच्या लायकीत रहावे; शशिकांत शिंदेंचा प्रतिहल्ला

बापाला विसरण्याची वृत्ती असणाऱ्यांकडून काय अपेक्षा बाळगावी

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सुरुवातीच्या काळात ज्यांनी महेश शिंदे यांना उभे केले, त्या शरद पवारांवर बोलण्याची महेश शिंदे यांची लायकी नाही. त्यांनी त्यांच्या लायकीतच राहावे, असा प्रतिहल्ला करून बापाला विसरण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वेगळी काय अपेक्षा बाळगावी, असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत महेश शिंदे यांनी यशवंत विचारांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लायकी काढण्याच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, महेश शिंदे यांनी आपण किती स्वच्छ आहोत, हे सर्वप्रथम पाहावे. स्वतः आरशात पाहून आपल्या कर्तृत्वाची गाथा गावी.आजवर त्यांनी कोणा कोणाला फसवले, कोणत्या भागीदारांना किती बुडवले याचा लेखाजोखाही आमच्याकडे आहे. मात्र निवडणुकीच्या काळात माझा विजय समोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यातून जे तोंडात येईल ते बरळण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे.

पवार साहेबांवर टीका केली तर काय होते हे आजवर अनेकांनी पाहिलं आहे. त्यामुळे महेश शिंदे यांच्या टीकेला आपण फारसे महत्त्व देत नाही. मी माझ्या पक्षाशी,नेत्याशी आणि जनतेशी प्रामाणिक आहे. त्यामुळे यशवंत विचारांच्या जिल्ह्यात चुकीच्या वृत्तींना बळ मिळू नये, म्हणून आम्ही लढाई लढत आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार.

महेश शिंदे आज चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. ते फार स्वच्छ असल्याचं दाखवत असले तरी त्यांचे असली रूप आता सर्वांनाच दिसू लागले आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्वभाव आहे. हिम्मत असेल तर रडीचे डाव खेळण्यापेक्षा जनतेसमोर येऊन त्यांनी खरे -खोटे करावे. मात्र यांच्या थापेबाजीमुळे जनता आता विश्वास ठेवणार नसल्याची खात्री त्यांना पटली आहे. यांच्या नादी लागून अनेक ठेकेदारांना रस्त्यावर येण्याची वेळ आली, असे सांगून कोरेगावात बांधलेली ३५ लाखाची संरक्षक भिंत लगेचच कोसळली, या एवढ्या एका उदाहरणातून महेश शिंदे यांचा काळाबाजार चव्हाट्यावर येत आहे असेही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.

भ्रष्टाचार केला असता तर भाजपात गेलो नसतो का?

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी चुकीचे आरोप करून मला गुंतवण्याचा आणि कपटाने अटक करण्याचा प्रयत्न विरोधक करत असले तरी, माझी बाजू सत्याची आहे. जर मी ४००० कोटीचा भ्रष्टाचार केला असता तर तो दडपण्यासाठी केव्हाच भाजपमध्ये प्रवेश केला असता. मात्र मी माझ्या पक्षात ठाम आहे, हेच माझ्या प्रामाणिक व पारदर्शक कारभाराचे द्योतक आहे, असेही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!