अपघाताने राजकारणात आलेले महेश शिंदेच ब्राझीलमधील फरार आरोपी : शशिकांत शिंदे

मुंबई बाजार समितीचे संचालक पानसरेंना झालेली अटक राजकीय हेतुने प्रेरित असल्याचाही आरोप

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): माझ्यावर फरार आरोपी असा आरोप करणारे महेश शिंदे हेच ब्राझीलहून फरार होऊन आलेले आहेत. त्यांनी भागीदारांसह किती लोकांना फसवले आहे आणि माझ्यावरील कारवाईसाठी मंत्रालयात हटून बसले होते याची इत्यंभूत माहिती मला आहे, अशा शब्दात खरपूस टीका महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

सातारा लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्या दरम्यान पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आत्ताच्या निवडणुकीत तरुणांसह आबालवृद्धांकडून मला मिळणारा प्रतिसाद आणि जनतेत असणारा उत्साह पाहता विरोधकांच्या हातातून ही निवडणूक कधीच गेली आहे. त्यामुळे त्यांची पूरती सटकली असल्याने ते निरर्थक बडबड करत आहेत.

नवी मुंबई बाजार समिती प्रकरणी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा व्यक्तींना अटक करून विरोधक रडीचा डाव खेळत आहे. खोट्या एफआयआर दाखल करून कोणीही आमचा आवाज दाबू शकत नाही. जनताच स्वतः शशिकांत शिंदे बनून ही निवडणूक हाती घेत आहे. त्यामुळे लढणं आमचं कर्तव्य आहे आणि जिंकणं हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे. जर मी ४००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असता तर मी बीजेपीत जाऊन बीजेपी वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ झालो असतो, अशीही टीका शिंदे यांनी यावेळी केली.

आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेच्या अनुषंगाने ते म्हणाले की, आजवर जे जे पवारसाहेबांवर निरर्थकपणे बोलले ते ते सर्वजण संपले, तीच अवस्था कोरेगावच्या सध्याच्या लोकप्रतिनिधीची होणार आहे. पवार साहेबांवर बोलणारे आणि ते वदवून घेणारे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. राजकारणात पराभव स्वीकारण्याचा दिलदारपणा आणि पराभव करण्याची ताकद असावी लागते. मात्र आमची वाढती ताकद पाहून विरोधकांनी मोठा धसका घेतला आहे.

नवी मुंबई बाजार समितीच्या कथीत भ्रष्टाचारप्रकरणी संजय पानसरे यांना झालेली अटक चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी लोकप्रियता व निवडून येण्याची शक्यता लक्षात घेऊन महायुतीकडून चुकीची पावले उचलली जात आहेत. कोणत्या आरोपाखाली पानसरेंना अटक झाली हे विरोधकांनी एकदा जाहीर करावे. त्यांना आरोपपत्र जाहीर करण्यास एकदा सांगावे. वास्तविक ज्यांनी याप्रकरणी आरोप केला, त्यांनी त्यांची तक्रारही मागे घेतली, मात्र केवळ ठराव केला म्हणून पानसरे यांना ताब्यात घेणे चुकीचे आहे. त्या शौचालयासाठी कोणत्या आमदारांनी व मंत्र्यांनी शिफारस केली याची चौकशी व्हावी व ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शशिकांत शिंदे यांनी केली.

विरोधकांचे आरोप कोर्टात टिकू शकत नाहीत हे लक्षात येऊनच माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. जे देशात व राज्यात इतरत्र घडत आहे, तेच आता सातारा जिल्ह्यातील घडवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. मात्र मी जिंकणारच असून जनतेच्या दरबारात माझा विजय सिद्ध झाला आहे. ये पब्लिक है सब जानती है….. असे सांगून काही लोकांचा तोल जात आहे. ही सरकारची हतबलता आहे, अशी टीकाही आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

दरम्यान आमच्या सभेत भाषण करणाऱ्यांना आमचा प्रचार करणाऱ्यांना धमकी, दमबाजीचे फोन जात आहेत, हे लोकशाहीला मारक आहे. मात्र आमच्या कार्यकर्ते व समर्थकांना त्रास दिल्यास आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला.

उदयनराजेंकडून भ्रष्टाचारांचे आरोप हा मोठा जोकच..

उदयनराजेंकडून होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, महाराज हे मोठे नेते आहेत. त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे फार मोठा जोक आहे. मात्र आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच यापूर्वी महाराज महाविकास आघाडीतच होते. महायुतीने त्यांना अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली,यातच सर्व काही आलं. खरं तर महायुतीने त्यांचा मान ठेवला नाही, मात्र महाविकास आघाडीत असताना त्यांना मान सन्मान देण्यात आम्ही कुठेही मागे पडलो नव्हतो.

error: Content is protected !!