सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गेले दोन वर्षे करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले कडक नियम आणि निर्बंध यांचा अवलंब करतात .सलग दुसऱ्या वर्षी आज पौष शुक्ल द्वादशीला साजऱ्या झालेल्या मकर संक्रांतीच्या सणांमध्ये महिलांचा उत्साह दिसून येत होता. अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच महिलांना वाणवसा घेण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली असली तरी महिलांनी मोठ्या उत्साहात दुपारी अडीच नंतर वाणवसा संपन्न केला.
यावर्षीची संक्रांत ही पिवळ्या रंगावर असल्याने महिलांनी पिवळा रंग वगळून भरजरी साड्या परिधान करून एकमेकीला हळदीकुंकू देत आणलेले लूटावयाचे दान देत हा सण उत्साहात साजरा केला. पुढील रथसप्तमीपर्यंत आता घरोघरी हळदी-कुंकवाचा सोहळा संपन्न होत असून करोना चे निर्बंध असूनही महिलांनी तोंडाला मास्क लावून सामाजिक अंतर राखत सातारा शहरातील विविध मंदिरात दुपारी दर्शनासाठी तसेच हळदीकुंकवासाठी गर्दी केली होती.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी फलटण येथील श्री राम मंदिर, चाफळ येथील श्री राम मंदीर तसेच सातारा शहरातील अनेक मंदिरात विशेष करून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हा वाणवसा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. मात्र जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि निर्बंध लक्षात घेत यावर्षी काही कठोर पावले उचलत मंदी व्यवस्थापनांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गर्दी व घाई मुळे करोनांचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात येत होते. संक्रांतीच्या पर्वकाळात दिवसभर सातारा शहरातील राजवाडा, मोती चौक, पवई नाका परिसरात लूटा वयाच्या वस्तू तसेच विड्याची पाने हळदीकुंकू मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येत होती .सायंकाळी उशिरापर्यंत,, तिळगुळ घ्या गोड बोला… म्हणत एकमेकाला काटेरी हलवा तसेच तिळाच्या वड्या देत आलिंगन देऊन तसेच मोठ्यांना नमस्कार करत हा सण पारंपरिक पद्धतीने घरोघरी साजरा करण्यात आला.
You must be logged in to post a comment.