माण बाजार समितीसाठी ५३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांचे भाजप रासप पुरस्कृत शेतकरी पॅनेल, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अनिल देसाई गट यांची माण विकास आघाडी तर शेखर गोरे यांचे शिवसेना पुरस्कृत परीवर्तन पॅनेल अशी दोन अपक्षासह तिरंगी लढत झाली. शनिवारी शांततेत मतदान झाले. २०६४ मतदारापैकी २०१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.५३ टक्के चुरशीने मतदान झाले. सतरा जागांसाठी दोन अपक्षासह ५३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

माण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदान झाले. सोसायटीमध्ये ८९५ पैकी ८७१, ग्रामपंचायतीमध्ये ८३५ पैकी ८२०, व्यापारी व आडते मतदार संघात ३३४ पैकी ३२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांची सकाळपासूनच चुरस पहायला मिळाली. सोसायटी सहकारी संस्था व ग्रामपंचायत या विभागाचे मतदान दहिवडी मलवडी मार्डी व म्हसवड या ठिकाणी प्रत्येकी दोन अशा आठ मतदान केंद्रावर घेण्यात आले. तर व्यापारी आडते मतदारांचे मतदान दहिवडी येथे घेण्यात आले.अनिल देसाई यांनी म्हसवड येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत संपली. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या सभागृहामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला सर्व केंद्रावरील मतदान एकत्र करुन प्रत्येकी २५ मतदानपत्रिकेचे गट्टे करण्यात येणार आहेत. साधारणतः दुपारी एक वाजेपर्यत सर्व मतमोजणी पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर, सहायक अधिकारी ए. आर. यलमर यांनी दिली.

error: Content is protected !!