मांढरदेव यात्रा रद्द, जमावबंदी लागू

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता तिसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील श्री.काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) या यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची आणि सुरुर येथील धावजी बुवाची वार्षिक यात्रा येत्या १६ ते १८ जानेवारी रोजी आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस शांकभरी पोर्णिमेला (ता.१७ जानेवारी) रोजी आहे. या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि आमवस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी १० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत फौजदारी दंड संहिता प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आदेश लागू केले आहेत.

error: Content is protected !!