सातारा जिल्ह्याचा देशात डंका; सर्वोत्तम ग्रामपंचायत अन् ग्रामउर्जाचा विशेष पुरस्कार प्रदान
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी सन्मान झालेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या लौकिकात राष्ट्रीय पुरस्कारांची आणखी मोहर उमटली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणखी दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी या गावचा बुधवारी राजधानी दिल्लीत गौरव करण्यात आला.
राज्य तसेच देशपातळीवरील विविध पुरस्कार पटकावणाऱ्या या ग्रामपंचायतीस नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्रामउर्जा स्वराज विशेष पुरस्कार प्रदान झाले. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि सरपंच रवींद्र माने यांनी हे पुरस्कार स्वीकारले. मान्याचीवाडी गावाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळवले आहेत. तसेच शासकीय योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीतही मोठे योगदान दिलेले आहे.
ग्रामविकासात प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार देण्यात येतात. यातील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामउर्जा विशेष पुरस्कार मान्याचीवाडीला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झाले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, ‘यशदा’चे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी सरिता पवार, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद यादव, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, वंदना पाचुपते आदी उपस्थित हाेते.
मान्याचीवाडी गावकऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद : याशनी नागराजन
मान्याचीवाडी ता.पाटण या चारशे लोकसंख्येच्या गावाची कामगिरी अभिमानास्पद आहे. हे केवळ या गावाचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे यश आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या वाडीने राष्ट्रीय स्तरावर १५ संवर्गातून पुरस्कार मिळवणे ही बाब खूपच महत्त्वाची आहे. सरपंच, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या एकीतूनच हे शक्य झाले आहे. गावचे कारभारी सक्रिय झाले तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक गावाला आपल्या गावाचा नावलौकीक करण्याची संधी आहे. त्या दृष्टीने प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सरपंच संवाद’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात ती यशस्वी ही झाली आहे . शासनाच्या गावासाठीच्या योजना कोणत्या आहेत आणि गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करता येईल याची सरपंचांनी ग्रामस्थांना माहिती करून देण्यासाठी हा उपक्रम आहे, असे ‘भूमिशिल्प’शी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.