आरक्षणासाठी साताऱ्यातून मराठा क्रांती मोर्चाची मुंबईकडे कूच

ठोस अध्यादेशाशिवाय माघार नाही; शिवतीर्थावरून आंदोलकांचा निर्धार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी चळवळीला साताऱ्यातून प्रचंड पाठबळ मिळाले आहे. आंतरवली सराटी (जालना) येथील नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवार २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. या ऐतिहासिक लढ्याला साथ देण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातून तब्बल ३०० वाहनांचा ताफा घोषणाबाजीसह मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

रवान्यापूर्वी सर्व आंदोलकांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवरायांच्या प्रेरणेने हा लढा लढणार, न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या मोर्चात तात्या सावंत यांच्यासह वैशाली जाधव, राजेंद्र बर्गे, सुवर्णा पाटील तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती साताऱ्याचे शंभराहून अधिक कार्यकर्ते, महिला सहभागी झाले आहेत. साताऱ्यातून निघालेला हा ताफा जात असताना ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘मराठा क्रांती मोर्चा जिंदाबाद’ अशा घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला.

यावेळी तात्या सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा हा आरपारचा आहे. आम्ही तो पूर्णपणे सनदशीर आणि चर्चात्मक मार्गाने लढवू. मात्र, आरक्षणाचा ठोस अध्यादेश मिळेपर्यंत मागे हटणार नाही. ही आमच्या समाजाची आरपारची लढाई आहे.

दरम्यान, या लढ्यामुळे मुंबईतील उपोषण अधिक भव्य आणि निर्णायक होणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न आता ऐतिहासिक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!